Shiv Sena Nagpur : इतर पक्षातून आलेल्या चापलुसांनाच पदे, निष्ठावान सैनिकांनी संपर्कप्रमुखांसमोर व्यक्त केला रोष !
कॉंग्रेसमधून आलेल्यांना पदे दिली. चापलुसांना प्रमुख पदे दिल्याने निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांना पदे दिली, त्यांच्या प्रभागात सेनेची शाखाही नाही, असेही संपर्कप्रमुखांच्या लक्षात आणून दिले.
नागपूर : कॉंग्रेस व इतर पक्षातून शिवसेनेत आलेल्यांना कार्यकारिणीत विविध पदे दिली जातात. परंतु, अनेक वर्षांपासून सेनेत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचा विचारही केला जात नाही. चापलूस पदाधिकाऱ्यांनाच मान मिळत असल्याबाबत शिवसैनिकांनी रविवारी रोष व्यक्त केला. त्यामुळे शहर शिवसेनेतही आलबेल नसल्याचे चित्र आहे. नागपूर शहरातील कार्यकारिणीत लादल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.
शहर शिवसेनेमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले. राज्यात शिवसेनेला येवढा मोठा धक्का बसला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले. तरीही श्रेष्ठींनी धडा घेतला नाही काय, असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. काल संपर्कप्रमुखांनी येथील शिवसेना भवनात बैठक घेतली. त्यामध्ये शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.
शिवसेनेत मोठे बंड झाल्याने मुंबईवरून विविध मतदारसंघ संपर्कप्रमुख नागपुरात आले आहेत. रविवारी रेशीमबाग येथील शिवसेना भवनात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पूर्व नागपूरचे संपर्कप्रमुख नरेश बुरघाटे, मध्य नागपूरचे संपर्कप्रमुख रितेश राहाटे, उत्तर नागपूरचे संपर्कप्रमुख सूरज राठोड यांच्यासह जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया बैठकीला उपस्थित होते. यावेळी तिन्ही मतदार संघाच्या संपर्कप्रमुखांनी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले. यावेळी शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिकांना कार्यकारिणीतील पदांपासून वंचित ठेवण्यात आल्याचे काही शिवसैनिकांनी सांगितले.
कॉंग्रेसमधून आलेल्यांना पदे बहाल करण्यात आली. ज्यांनी पक्षासाठी कुठलेही काम केले नाही, ज्यांची हकालपट्टी करण्यात येणार होती, त्यांच्याकडेच प्रमुख पदे दिल्याने निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांना पदे दिली गेली, त्यांच्या प्रभागात शिवसेनेची शाखाही नाही, असेही या शिवसैनिकांनी संपर्कप्रमुखांच्या लक्षात आणून दिले.
ना पद, ना समिती
राज्यात सरकार असताना निष्ठावंतांना कुठलेही पद, समिती देण्यात आली नाही. यावेळी संपर्कप्रमुखांनी त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी संपर्कप्रमुखांनी शिवसैनिकांच्या मतांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी शिवसैनिकांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
बैठकीला शहर संघटक किशोर पराते, सुरेखा गाडे, हरिभाऊ बानाईत, महेंद्र कठाणे, अंकुश कडू, राजेश कनोजिया, अजय दलाल, किशोर राठोड, सपना ठाकरे, महिमा राकेश दावधरिया, श्रावण खापेकर, चंद्रकांत कावरे, संदीप रियाल पटेल, शेखर खरवडे, प्रज्वल कडू, कौशिक येवले, आशिष चंद्रिकापुरे, रफीया अंजुम, वैशाली गजानन ठाकरे, उमेश निकम, संजय कसोधन, रोशन वानखेडे, जागेश्वर खापेकर, राजेश राजपांडे, समित कपाटे, अजय माने, दिलीप तुपकर, वैशाली उदापूरकर, तृप्ती पसिने, बबलू दरोडे, प्रदीप तुपकर, पितांबर घोलप, अमोध जांभूळकर, हरीश अचयेवार, देवेंद्र माहुरकर, प्रफुल लंडीये, माधुरी मौंदेकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.