(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur News : निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारांमुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टर दाम्पत्याला 40 लाख रुपयांचा दंड
Latur News : निष्काळजीपणे उपचार केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला होता. या घटनेला जबाबदार असणाऱ्या लातूरमधील डॉक्टर दाम्पत्याला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. चाळीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Latur News : लातूरमधील (Latur) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (Consumer Disputes Redressal Commission) एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत तक्रार आल्यानंतर ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अकरा महिने 28 दिवसात निकाल देत डॉक्टर दाम्पत्याला (Doctor Couple) तब्बल 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लातूर जिल्ह्यातील नणंद या गावातील रेवती गावकरे ही 27 वर्षीय महिला मागील वर्षी घरकाम करताना पडली होती. त्यांच्या हाडाला मार लागला होता. उपचारासाठी त्यांना लातूर इथल्या डॉ विक्रम सूर्यवंशी आणि डॉ श्वेता सूर्यवंशी यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या शुद्धीवरच आल्या नाहीत. यानंतर डॉक्टर दाम्पत्याने रुग्णाच्या नातेवाईकांना याबाबत माहिती न देता परस्पर दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. तिथे तपासणी झाल्यानंतर रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं होतं.
डॉक्टर दाम्पत्याविरोधात तक्रार, 11 महिने 28 दिवसात निकाल
मृत रेवती गावकरे यांना दोन लहान मुले आहेत. किल्लारी येथील खाजगी दुकानावर त्या काम करत महिना नऊ हजार रुपये कमवत होत्या. वडिलांकडे दोन्ही लहान मुलांना घेऊन त्या राहत होत्या. अचानकपणे मुलगी दगावली आणि दोन नातू सांभाळण्याची जबाबदारी आजोबा मोहन पाटील यांच्यावर आली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रेवती गावकरे यांचा मृत्यू झाला असा आरोप वडिलांनी केला. अखेर डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात रुग्ण हक्क समितीच्या सहकार्याने त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगात डॉक्टर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली. यावर प्रकरणावर कारवाई करत ग्राहक मंचाने अकरा महिने 28 दिवसात निर्णय दिला. निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे रेवती गावकरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युसाठी जबाबदार असणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला दोन मुलांच्या उदरनिर्वाहासाठी चाळीस लाख रुपये द्यावेत, असा निर्णय ग्राहक मंचाने दिला.
या निकालानंतर चित्र बदलेल, रुग्ण हक्क समितीला विश्वास
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होतो, अशी ओरड सातत्याने होत असते. मात्र रुग्णांचे नातेवाईक कायदेशीर लढाईच्या प्रक्रियेला सामोरे जात नाहीत. यामुळे दोषी डॉक्टरांना भीती वाटत नाही. मात्र या निकालानंतर चित्र बदलेल असा विश्वास रुग्ण हक्क समिती सदस्यांना वाटत आहे.
हेही वाचा
Latur News : चिमुकल्या मुलीचा ग्रामसभेत सवाल..सरपंच आणि ग्रामसेवक अवाक; पाहा व्हिडिओ