(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur News : चिमुकल्या मुलीचा ग्रामसभेत सवाल..सरपंच आणि ग्रामसेवक अवाक; पाहा व्हिडिओ
Latur News : लातूरमधील एका गावातील ग्रामसभेत चिमुरडीने सरपंच आणि ग्रामसेवकांना रस्ता दुरुस्तीचे काम कधी पूर्ण होणार, असा थेट सवाल केला.
Latur News : ग्रामसभा गावातील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ असते. या व्यासपीठावर गावातील विविध प्रश्नांची चर्चा होत असते. याच ग्रामसभेत चौथीच्या एका मुलीने रस्त्याचा प्रश्न उपस्थित करत सरपंच आणि ग्रामसेवकांना चांगलंच धार यावर धरल्याचं व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारतासारख्या देशात लोकशाही किती खोलवर रुजली आहे याच एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येऊ शकते.
लातूर जिल्ह्यातील अनेक गावासारखं चिकलठाणा हे एक गाव आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीला या गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. चिकलठाणा गावाचे सरपंच उत्तम बनसोडे आणि ग्रामसेवक अवधूत कलबोणे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ग्रामसभेला हजर होते. त्याचवेळी अचानक गावातील वैभवी बुदृपे ही चौथीत शिकणारी मुलगी ग्रामसभेत आली आणि तिने रस्त्याचा विषय मांडला.
वैभवीने रस्ता कधी होणार आहे...तीन महिने झाले वाट पाहत आहे .. तुम्ही सरपंच ही झाले मात्र रस्ता होत नाही..त्यावेळी काय म्हणाले होते ..मला पण कळतय..रस्ता करतो म्हणाले होते..कधी करणार रस्ता.. अशा प्रश्नांची सरबत्ती करत आम्हाला तो रस्ता नीट करून पाहिजे म्हणजे पाहिजे अशी मागणी केली.
ग्रामसभेत लहान मुलीच्या थेट प्रश्नांमुळे सरपंच ग्रामसेवक ही निरुत्तर झाले. या लहान मुलीचा आवेश आणि मागणी पुढे सगळे नतमस्तक झाले. अखेर लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून देवू असा शब्द घेतल्यावरच वैभवी तेथून निघून गेली.
वैभवी ही गावातील नरसिंग याची मुलगी आहे. त्याचे पुण्यातील हिंजवडी येथे हॉटेल आहे. घराच्या बांधकामासाठी मागील तीन महिन्यापासून संपूर्ण परिवार येथे आहे. या तीन महिन्यात गावातील रस्त्याचा प्रश्न वैभवीच्या लक्षात आला. तिने तो ग्रामसभेत मांडला. पुढील तीन तारखेला पुन्हा ग्रामसभा आहे. या प्रश्नाचे काय झाले हे विचारल्याशिवाय मी गाव सोडणार नाही ह्यावर ती ठाम आहे.
वैभवीचे वडील नरसिंग यांनी सांगितले की, गावातील घराचे बांधकाम करण्यासाठी मी गावात आलो आहे. गावातील रस्त्याचा विषय गंभीर आहे. माझा मुलगा आणि मुलगी ह्या रस्त्यावर सायकल खेळत असतात. रस्ता खराब झाला आहे. त्यांनी त्याबाबत गावातील ग्रामसभेत मते मांडली आहेत. गावात वैभवीने मांडलेल्या प्रश्नाबद्दल कौतुक वाटत असून याचा आनंदच आहे असे मत नरसिंग बदृपे यांनी व्यक्त केले आहे. लोकशाही मजबूत करणारी ही घटना अतिशय छोटी असली तरी ग्रामीण भागात ग्रामसभा त्याचे महत्व ठळकपणे आधोरेखित करणारी आहे.