Latur Crime News : पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पत्नीवर दाढी करण्याच्या ब्लेडने वार; लातूरमधील धक्कादायक घटना
Latur Crime News : मंगळवारी रात्रीच्या सुमारास लातूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
Latur Crime News : लातूर (Latur) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर थेट दाढी करण्याच्या ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास लातूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पत्नीवर ब्लेडने वार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत जखमी महिलेने म्हटले आहे की, लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तिच्या पतीने तिला फोन केला होता. फोन करून औसा रोडवरील राजीव गांधी चौकातील मुलांच्या एका वसतिगृहात बोलावून घेतले. महिला त्या ठिकाणी पोहचल्यावर उलट तू येथे कशी काय? अशी विचारणा सुरु केली. तसेच तू येथे काय करतेस, असं म्हणत वाद घालू लागला. दरम्यान, तुम्हीच फोन करून बोलावून घेतले म्हणून येथे आल्याचं उत्तर महिलेने दिले. त्यामुळे याचा आलेल्या पोलीस पतीने पत्नीला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
आधी शिवीगाळ केल्यावर नंतर त्याने पत्नीसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने थेट केस ओढून, लाथाबुक्यांनी पत्नीला मारहाण सुरु केली. एवढंच नाही तर, काही वेळाने या पोलीस कर्मचाऱ्याने दाढी करण्याच्या ब्लेडने पत्नीवर वार केला. ज्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. तर जखमी महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून हल्ला...
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पत्नीला मारहाण करत तिच्यावर ब्लेडने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. तर, पोलीस दलात देखील याची जोरदार चर्चा आहे. मात्र, हे सर्व प्रकरण कौटुंबिक असून हा प्रकार देखील कौटुंबिक वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पैसे कधी देणार म्हणून केली मारहाण
दुसऱ्या एका घटनेत पैसे कधी देणार म्हणून एकाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना कव्हा नाका परिसरातील तारा पान स्टॉल येथे घडली. याबाबत दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी शरिफ हाजी अमिन शेख आणि त्यांचा मुलगा पान स्टॉलवर आले असता, शेरा उर्फ शशिकांत इर्ले याने, 'तू माझे पैसे कधी देणार आहेस', असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. 'तुम्ही जर माझे पैसे दिले नाही तर तुम्हाला बघून घेतो', असे म्हणून धमकी दिली असे शरिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गांधी चौक पोलिसात शेरा उर्फ शशिकांत इर्ले (शेरा) चिठ्ठ्या (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nagpur Crime : हत्येच्या घटनांनी नागपूर जिल्हा हादरला, एकाच दिवसात चार जणांचा खून