Suraj Chavan VIDEO : सत्तेत आहोत म्हणजे सगळं काही चुकीचंच करतोय असं नाही; कार्यकर्त्याला बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर दादांच्या पक्षाचे सूरज चव्हाण काय म्हणाले?
Suraj Chavan Video : ही मारहाण होत असताना पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते की नाही मला माहिती नाही. पण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना अनावर झाल्या आणि तसं पाऊल आम्ही उचललं असं सूरज चव्हाण म्हणाले.

लातूर : विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्याचा राजीनामा द्या अशी मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान मारहाण केली. यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे स्वतः छावाच्या कार्यकर्त्याला कोपर-बुक्यांनी मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी अपशब्द वापरल्यामुळे जशास तसं उत्तर दिलं. भावना अनावर झाल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललं असंही ते म्हणाले. सत्तेत आहोत म्हणून सगळंच काही चुकीचं करतोय असं नाही असं वक्तव्य यावेळी सूरज चव्हाण यांनी केलं.
Suraj Chavan Laur Rada Video : नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं. रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या असं म्हणत त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. त्यामध्ये युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घाटगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओत दिसून येतंय.
Suraj Chavan Video : भावना अनावर झाल्या म्हणून मारलं
या प्रकरणावर सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्यामुळे हे पाऊल उचललं असं सूरज चव्हाण म्हणाले. त्यांची मागणी संविधानिक पद्धतीने करायला हवी होती. ती मागणी करताना त्यांनी असंविधानिक शब्दांचा वापर केल्याने अशी प्रतिक्रिया उमटणारच असंही ते म्हणाले.
तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली. पण त्या कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरला. बाहेर जाताना त्यांनी अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला अशा पद्धतीने प्रतिसाद दिला असं सूरज चव्हाण म्हणाले.
सत्तेत आहोत म्हणजे...
सत्तेत आहोत म्हणजे आम्ही सगळं काही चुकीचंच करतोय असं नाही असं सूरज चव्हाण म्हणाले. सत्तेत आहोत याचा अर्थ कुणीही येऊन आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोललं तर अशाच पद्धतीने उत्तर देणार असंही सूरज चव्हाण म्हणाले.
सत्ताधारी आहोत म्हणून नम्रतापूर्वक त्यांची मागणी ऐकली. पण असंविधानिक पद्धतीचा वापर केल्यानं जशास तसं उत्तर दिलं. सुनील तटकरेंच्या अंगावर पत्ते टाकल्याचं सगळ्यांनी पाहिलं आहे. पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सूरज चव्हाण यांनी केली.
ही बातमी वाचा:























