(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, 30 पेक्षा अधिक गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी
Maratha Reservation : लातूरच्या मांजरा पट्ट्यातील 30 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ गावातील खंडोबा मंदिरात घेतली.
लातूर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता आणखीनच तापताना पाहायला मिळत असून, राज्यातील गावागावात आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. तर, लातूर (Latur) जिल्ह्यात देखील आंदोलनाची धग कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर तालुक्यातील 30 पेक्षा अधिक गावात पुढाऱ्यांना गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला असून, सोबतच या गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासाठी लातूर तालुक्यातील गादवड येथे मागील आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान, या साखळी उपोषणादम्यान रविवारी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या भागातील मांजरा पट्ट्यातील 30 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ गावातील खंडोबा मंदिरात घेतली. सोबतच, बहिष्कार टाकलेल्या या तीस गावांमध्ये गाव पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाची धग आता गावागावात पोहचल्याची पाहायला मिळत आहे.
बैठकीत नेमकं काय ठरलं?
- मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.
- लातूर तालुक्यातील मांजरा पट्ट्यातील गादवड गावात 30 गावच्या गावकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु असून, पुढेही सुरूच राहणार.
- मराठा समाजाला सरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या 30 गावांमध्ये पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मागणी पूर्ण होईपर्यंत या 30 गावातील गावकऱ्यांनी मतदानावर देखील बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गावकरी ग्रामदैवत खंडोबाच्या मंदिरात एकत्र आले
लातूर तालुक्यातील मांजरा पट्ट्यात असलेल्या गादवड, तांदुळजा, वांजरखेडा, पिंपळगाव भोसा, पिंपरी, कानडी बोरगाव, टाकळगाव, सारसा, बोडका, जोडजवळा यासह एकूण 30 गावांतील नागरिक रविवारी ग्रामदैवत खंडोबाच्या मंदिरात एकत्र आले. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली आणि पुढील आंदोलनाची दिशा देखील ठरवण्यात आली. यावेळी पुढाऱ्यांना गावबंदीचा आणि मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पुढाऱ्याला गावात येऊ द्यायचे नाही, तसेच कोणत्याही निवडणुकित मतदान करणार नाही, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
मनोज जरांगे उद्या लातूरच्या दौऱ्यावर...
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जरांगे उद्यापासून दोन दिवसीय लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. मनोज जरांगे पाटील हे 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यात असणार आहे. बुधवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांची पाखरसांगवी येथे जाहीर सभा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : ऐतिहासिक विजय जवळ आलाय, सरकारला सुटका नाहीच; नांदेडच्या सभेतून जरांगेंचा इशारा