मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात वीज पडून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मत्यू झाला असून उर्वरित सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

लातूर : जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने पावसाने हजेरी लावली असून आजही सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं लातूर (Latur) जिल्ह्यातील अनेक भागात पाणीच पाणी झालं आहे, नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. जिल्ह्यातील मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, वीज कोसळून काही दुर्घटना घडत आहेत. शेतात मान्सून पूर्व मशागतीची कामे आणि शेंगा वेचण्यासाठी गेलेल्या 8 शेतमजुरांवर काळाने घाला घातला. अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथे दुपारनंतर जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी हे 8 मजूर एका झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी या झाडावर वीज (Lightning) कोसळली. या घटनेत 8 पैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यात, विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात वीज पडून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मत्यू झाला असून उर्वरित सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ अहमदपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळतात अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर तात्काळ सहा जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये, लातूर जवळील, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.
सोलापुरात 24 तास मुसळधार
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मोहोळ तालुक्यातील वटवटे येथे अवकाळी पावसामुळे खरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले. वटवटे गावातील कामन्ना पाटील यांच्या हाती आलेले खरबूज पीक अक्षरशः कीड लागून वाया गेले. खरबूजसह उन्हाळी कांदा, आंबा इत्यादी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून भरघोस मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंचनामे करण्याचे काम सुरू - सुनेत्रा पवार
बारामतीमधील अतिवृष्टीची राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पाहणी केलीय. गेल्या दोन-तीन दिवसापासून बारामतीत पाऊस पडतोय. काल ज्या पद्धतीने पाऊस झाला कॅनल फुटला त्यानंतर परिस्थिती गंभीर झाली शेतकऱ्यांनी अनेकांनी मला संपर्क साधला. मी कालपासून या परिस्थितीचा आढावा घेत आहे. अतिवृष्टी झालेली स्थिती भयानक असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाला नुकसानीच्या पंचनामाचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेले आहेत. झालेल नुकसान मोठं आहे. त्यामुळे ते भरून येणार नाही पण या नुकसाने वर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे खासदार सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
























