(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur News: लातूरमध्ये चारा टंचाईच्या झळा... चारा महागला, जनावरे विक्रीसाठी बाजारात
Latur News: जनावरांसाठी लागणारा चारा महाग झाल्याने पशुपालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच जनावरांना बाजारात देखील भाव मिळत नाही.
Latur News: हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे लातूरमधील (Latur) दुग्ध व्यवसायिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच चारा महागल्यामुळे दुभती जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे भाकड जनावरांची तर थेट विक्री करण्यात येत आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील प्रत्येक बैल बाजारात हे चित्र पहावयास मिळत आहे. लातूरमधील कडबा बाजारात अनेक ठिकाणी शेतकरी आणि पशुपालक बाजारात फिरुन कुठे स्वस्त चारा मिळतो का याची देखील पाहणी करत आहेत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडल्याचं चित्र दिसतंय.
सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच चारा पिकांची लागवड खूप कमी प्रमाणात झाली असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा बाजारात आहे, मात्र त्याची किंमत गगनास भिडलेली आहे. सध्या हिरव्या चाऱ्याचे दर खूप वाढलेले आहेत. हिरव्या चाऱ्याची एक पेंड 30 ते 35 रुपये झाली आहे. दूध देणाऱ्या जनावरांसाठी दिवसाला आठ ते दहा पेंड्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. त्यामुळे दिवसाला जवळपास साडेतीनशे रुपये या जनावरांसाठी खर्च करावा लागत आहे. तसेच या जनावरांकडून मिळणारे दुध आणि होणारा खर्च याचा मेळ देखील बसत नाही आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे पशू पालक अत्यंत अडचणीत आल्याचं म्हटलं जात आहे.
यावर्षी चारा पिकाच्या लागवड क्षेत्रात कमालीची घट झाल्याचं चित्र आहे. अगोदरच वाळलेल्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या सर्व परिस्थितीतच अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि उत्पादनात अधिक घट झाली. त्यामुळे वाळलेल्या चाऱ्याची टंचाई देखील निर्माण झाली होती. ज्या शेतकऱ्यांकडे अधिक जनावरे आहेत त्यांच्याकडे जर चाऱ्याची सोय नसेल, तर अशा शेतकऱ्यांसमोर आता वैरण गोळा करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागण्याची शक्यता आहे.
खर्च परवडत नसल्याने जनावरे बाजाराकडे
दुभत्या जनावरांना सांभाळणे पशुपालकांसाठी अत्यंत कठिण होत असल्याचे चित्र सध्या लातूरमध्ये आहे.उत्पादन खर्च आणि होणारे उत्पादन याचा मेळ बसत नसल्याकारणाने पशुपालक आता जनावरे बाजाराकडे घेऊन जात आहेत. भाकड जनावरे सांभाळणे तर दुभत्या जनावरांपेक्षाही अवघड आहे. होणारा खर्चाचा विचार करता ही जनावरे बाजारात मिळून विकलेली बरी असा विचार आता पशुपालक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील हळी हंडरगुळी, मुरुड उदगीर आणि लातूरच्या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत.