(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातुरातील महिला सरपंचाच्या धडाकेबाज निर्णयाचं कौतुक, कन्यादान आणि सुकन्या योजनेसाठी पाच वर्ष देणार स्वतःचे पैसे
Latur News: मुलींच्या विकासासाठी असणाऱ्या सुकन्या योजनेसाठी महिला सरपंचांने आपल्याकडील पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.
लातूर : गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीत कायमच टोकदार प्रचार होत असतो. काही गावात सरपंचपदासाठी मोठी आर्थिक बोलीही लागत असते. मात्र एकदा निवडणूक पार पडली की गावाच्या विकासाबाबत किंवा योजनांबाबत तो आक्रमकपणा दिसून येत नाही. मात्र बेंडगा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच याला अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
का होत आहे चर्चा?
लातूर जिल्ह्यातील बेंडगा हे गाव आजकाल चर्चेत आहे. सतराशे लोकसंख्या असलेल्या या गावाच्या सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी पदभार घेतल्यापासून धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात कन्यादान आणि सुकन्या योजनेचा समावेश आहे. यासाठी कोणत्याही शासकीय निधीसाठी त्या अवलंबून राहिल्या नाहीत. यासाठी लागणारा निधी त्यांनी स्वतः दिला आहे, तोही पुढील पाच वर्षासाठी.
काय आहेत योजना ?
मुलाच्या जन्मदराच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी आहे. यासाठी सामाजिक मानसिकता कारणीभूत आहे. समाजाने मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणून नूतन सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी पहिल्याच ग्रामसभेत आपले पती आदर्श शिक्षक कै. तात्याराव कडाजी धुमाळ यांच्या स्मरणार्थ खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या नावाने गावात जन्मलेल्या मुलीसाठी सुकन्या योजना सुरू केली आहे. यात गावातील कोणत्याही घरात मुलगी जन्म घेत असेल तर अकरा हजार रुपये एफडी करण्यात येतील. तसेच येणाऱ्या पाच वर्षात गावातील ज्या मुलीचा विवाह होणार आहे त्या मुलीस भेट द्यावी या हेतूनं अकरा हजार रुपयाचे संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने गावातील कन्यादान होणाऱ्या प्रत्येक मुलीला संसार उपयोगी साहित्याचा आधार व्हावा म्हणून 11 हजार रूपयांचे साहित्य कन्यादान स्वरूपात देण्यात येणार आहे. गावातील सर्वांना याचा लाभ घेता येईल. त्यासाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही हे विशेष.
पेन्शनच्या पैशातून करणार मदत
मोहरबाई तात्याराव धुमाळ यांचे पती कै. तात्याराव धुमाळ हे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्याच्या निधनानंतर मोहरबाई यांना पेन्शन मिळते. एक मुलगा आहे तो घराची सहा एकर बागायत शेती पहातो. यामुळेच मोहरबाई यांनी पेन्शनच्या पैशातून या कामासाठी लागणारा निधी देण्याचे ठरवले आहे.
सरपंचपदी नुकतंच विराजमान झालेल्या मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी ही योजना 1 जानेवारीपासून अमलात आणली आहे. याचा लाभ गावात जन्म घेतलेल्या दोन मुलींना झाला आहे. संपूर्ण गावच एक घर आहे या विचाराने आम्ही काम करतोय, पुढील पाच वर्षे असेच काम सुरू राहणार आहे, सात सदस्य आणि एक सरपंच असे आठ लोक गावाचा कारभार कुटुंबप्रमुखाच्या रुपात पहाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सरपंच पदासाठी निवडून आल्यानंतर गावाच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करावे अशी इच्छा होती. त्याची सुरुवात स्वतःपासून करावी यासाठी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या दोन योजना स्वत:च्या खर्चातून सुरू कराव्या असे वाटले. पहिल्याच ग्रामसभेत तशी घोषणा केली, 1 जानेवारी 2023 पासून योजना लागू केली. याचा लाभ गावातील दोन नवजात मुलींना झाला आहे. यासाठी कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. गावात लेक जन्मली, गावातील मुलीचे लग्न जमले तर कळतेच की असे मत सरपंच मोहरबाई तात्याराव धुमाळ यांनी व्यक्त केले आहे.
गावाच्या विकासाला निधी मिळत नाही, योजना मंजूर होत नाहीत अशी तक्रार अनेक सरपंच करत असतात. मात्र गावाच्या सर्वागीण विकासासाठी फक्त सुरुवात स्वत:च्या घरातून केली तर एक छोटी पायवाट विकासाचा महामार्ग बनू शकतो.
ही बातमी वाचा :