(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur News : महावितरणचा हलगर्जीपणा आणि लोडशेडिंग जीवावर बेतलं, लातूरमध्ये तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Latur News : पहाटे ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला आणि करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. लातूरमधील मोरतळवाडी इथे ही दुर्देवी घटना घडली.
Latur News : महावितरणचा (Mahavitaran) हलगर्जीपणा आणि लोडशेडिंग (Load Shedding) लातूरमधील (Latur) एका शेतकऱ्याच्या (Farmer) जीवावर बेतलं आहे. पहाटे ऊसाला (Sugarcane) पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला आणि करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. मोरतळवाडी इथे ही दुर्देवी घटना घडली.
मोरतळवाडी या गावातील शेतकरी रामराव पद्देवाड (वय 65 वर्षे) हे आज पहाटे चार वाजता ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्या वेळी रस्त्यात विजेची तार (High Tension Electric Wires) तुटून पडली होती. तार कधी आणि कशी तुटली याची कोणतेही माहिती रामराव यांना नव्हती. या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच जळून मृत्यू झाला. पहाटे शेतात गेलेले रामराव यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे शोधाशोध सुरु झाली आणि ही धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
याची माहिती वाढवणा पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम करण्यासाठी मृतदेह हलवण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. महावितरणकडून सतत होत असलेल्या हलर्जीपणामुळे अनेक जीव जात असतात तसा हा एक गेला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
कशी घडली घटना?
रामराव पेद्देवाड हे नेहमीप्रमाणे सकाळी शेताकडे निघाले होते. आठ एकर शेती असलेल्या रामरावांनी तीन एकरमध्ये ऊस लावला होता. याच शेतीच्या आधारावर त्यांनी दोन मुलींची लग्न केली होती आणि एक मुलाबरोबर ते मोरतळवाडी या गावात राहत होते. शेताकडे निघाले असताना रस्त्यात विजेची तार तुटून पडली होती. या तारेवर त्यांचा पाय पडल्याने विजेचा जोरदार झटका लागून जागेवरच जळून जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे
रात्रीची लाईट शेतकऱ्यांच्या जीवाचं बरं वाईट
शेतकऱ्यांना रोज रात्री जागरण करण्याची वेळ आली आहे. रात्री बारा ते सकाळी आठ या वेळेतच वीज असल्याने शेतीला पाणी द्यायचं असेल तर रात्रीच जाण्याची आवश्यकता आहे. यामुळे रात्री बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांचे जीव कायमच टांगणीवर असतो. जंगली प्राणी, चोर याबरोबर अनेक संकटांचा त्यांना सामना करावा लागत असतो. अनेक वेळा जीवावरही बेतत असतं.
हेही वाचा