Latur : दोन गटात हाणामारी, 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले; उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची मध्यस्थी व्यर्थ
Latur News : लातूरमधील संत तुकाराम विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोषी आढळलेल्या 14 विद्यार्थ्यांवर विद्यालय प्रशासनाने कारवाई केली आहे.
Latur News : लातूरमधील संत तुकाराम विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोषी आढळलेल्या 14 विद्यार्थ्यांवर विद्यालय प्रशासनाने कारवाई केली आहे. या 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. शाळेच्या या निर्णायामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि दोन आमदार आणि जिल्हा अधिकाऱ्यांची मध्यस्थी याप्रकरणी कामाला आली नाही. संत तुकाराम विद्यालय प्रशासनाने 14 विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र पाठवत पाल्यांना शाळेतून काढल्याचे सांगितेय. या कृत्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची आणि मारामारीच्या वेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची शिस्तपालन समितीने चौकशी केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेजवरून शिस्तपालन समितीला आपला पाल्य या घटनेत सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले आहे, असे शाळेनं पाठवलेल्या पत्रात उल्लेख आहे.
25 एप्रिल 2023 रोजी लातूरमधील संत तुकाराम विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली होती. या हाणामारीत दोषी असणाऱ्या 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय संत तुकाराम विद्यालय प्रशासनाने घेतला. याबाबत आता प्रचंड वाद निर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, दोन आमदार, जिल्हाअधिकारी या सर्वांनी शाळा प्रशासनासोबत चर्चा केली, मात्र उपयोग शून्य झालाय. त्या 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णयावर शाळा प्रशासन ठाम आहे.
सीबीएससीच्या या शाळेतून बाहेर गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा? त्यासाठी कुठे जावं? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. या चौदा मुलांचे भवितव्य आता अंधारात आहे. या चौदा मुलांच्या पालकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री तसेच दोन आमदार यांच्याकडे तक्रार केली होती. निवेदन दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरचे जिल्हा अधिकारी पृथ्वीराज बीपी यांना याची योग्य ती माहिती घेऊन शाळा प्रशासनाला सूचना करण्यात याव्या, असं सांगितलं होतं. मात्र शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी ठेवलं आहे. औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही शाळा प्रशासनाची चर्चा केली होती, मात्र उपयोग झाला नाही.
मॅनेजमेंटची मिटिंग घेऊन यावर निर्णय घेऊ, असं शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. शाळा प्रशासनाची एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला असता प्राचार्यांनी सुरक्षारक्षकांकरवी भेटण्याची तयारी नसल्याची माहिती दिली आहे. आमच्या पाल्यांना आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश देऊ, मात्र आम्हाला त्या घटनेचा सीसीटीव्ही पाहावयास द्यावा, अशी पालकांची मागणी आहे. मात्र शाळा प्रशासन ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. यामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप आहे.
शाळेने पालकांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलेय ?
प्रिय पालक,
तुम्हाला कळविण्यात येते की संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, लातूर हे शिस्त आणि मूल्यांसाठी ओळखले जाते. परंतु दुर्दैवाने 25 एप्रिल 2023 रोजी शाळेत एक भयानक घटना घडली. सकाळी 7:46 वाजता विद्यार्थ्यांचे दोन गट शाळेत एकमेकांशी भांडले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व विद्यार्थी एकमेकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यात काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचे रक्त सांडले आहे.
या कृत्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची आणि मारामारीच्या वेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची शिस्तपालन समितीने चौकशी केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेजवरून शिस्तपालन समितीला आपला पाल्य या घटनेत सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
चौकशीअंती शिस्तपालन समितीच्या सदस्यांनी ही उत्स्फूर्तता पणे नसून पूर्वनियोजित होती. या लढ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आपला पाल्य आर्यतेज चालुक्य यांचा सक्रिय सहभाग होता. त्याने एक गट केला आणि इतर विद्यार्थ्यांना घाबरवण्यास सुरुवात केली. मारामारीत त्याने विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. तो गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेला दिसला ज्याला प्रवृत्त केले जाऊ शकत नाही. हे इतर विद्यार्थ्यांकडून क्रॉस-वेरिफाईड केले गेले.
हाणामारी इतकी तीव्र होती की अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शाळेचे शांत, विद्यार्थी अनुकूल वातावरण बिघडले आहे. अशा कृत्यांमुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा प्रकारच्या कृत्यामुळे इतर विद्यार्थ्यांना असामाजिक कृत्ये करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. यामुळे शाळेतील एकोपा, प्रतिष्ठा आणि एकूणच शैक्षणिक वातावरण बिघडते.
त्यामुळे तुमच्या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे
१४ मुलांना काढले. पाच जणांना सोडले.