Crops Insurance: गायरान जमीन लातूरची ...पिक विमा लातूरमधला...भरणा केला बीडमधील व्यक्तीने; आणखी एक घोटाळा उघड
Crop Insurance Scam: लातूरमध्ये गायरान जमिनीवरील भात पिक विमा काढला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा विमा बीडमधील व्यक्तीने काढला आहे. एक रुपयातील पिक विमामध्ये हा गैरप्रकार झाला आहे.
Crop Insurance Scam: सरकारी योजना तयार झाली की त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांपेक्षा घोटाळेबाज जास्त पुढे येत असतात. असाच प्रकार लातूरमध्ये (Latur News) पहावयास मिळाला आहे. एक रुपयात पिक विमा या योजनेचा लाभ घेत चक्क गायरान जमिनीचा (Gairan Land) पिक विमा (Crop Insurance) काढण्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे.
खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. सीएससी केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका ही तृणधान्य आणि कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील, अशी ही योजना आहे. यासाठी गावोगावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करत या योजनेचा प्रसार करण्यात आला आहे .
30 एकर गायरान जमिनीचा विमा...
निलंगा तालुक्यातील जेवरी येथील सर्वे नंबर 22 मध्ये एकूण 30 एकर गायरान जमीन पडीक आहे. या गायरान जमीनीवर गावातील गुरे चरतात. अनेक वर्षापासून ही शासकीय जमीन पडीक आहे. शासनाच्या मालकीची जमीन आहे अशी नोंदही शासन दरबारी आहे.माञ एका अज्ञात व्यक्तीने चक्क या गायरान जमिनीचा विमा भरला आहे. या जमिनीवर 4 हेक्टर सोयाबीन आणि भात तसेच 8 हेक्टर सोयाबीन आणि भात लागवड केल्याचा विमा भरला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एक रूपया भरा आणि विमा मिळवा या योजनेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ही शक्कल लढवली आहे.
ग्रामस्थांना आले लक्षात ....
पिक विमा कसा आणि कोणी भरला आहे याची माहिती घेणाऱ्या गावातील एका व्यक्तीच्या लक्षात ही बाब आली. गावातील रहिवासी संभाजी तारे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव आणि तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्याकडे तक्रार केली आहे. या गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच ज्या सीएसी केंद्रावर हा गायरान जमिनीचा अज्ञाताने विमा भरला आहे याचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तो व्यक्ती निघाला बीडचा ....
गायरान जमिनीचा पिक विमा भरणारा सदर व्यक्ती बीडमधील असल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या व्यक्तीने लातूर जिल्ह्यातील जेवरी येथील गायरान जमिनीचा पिक विमा का भरला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. महाराष्ट्रातील प्रत्येक गावागणित गायरान जमीन उपलब्ध आहे. प्रत्येक गायरान जमिनीचा या योजनेचा लाभ घेत पिक विमा भरून शासनाची कुठल्याही रुपयाची फसवणूक करण्यात येते का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय. जेवरी या भागात भात पिकाची लागवड केली जात नसतानाही त्यावर भात पिकाची लागवड केली असेही नमूद करण्यात आला आहे. भात पिकाला 49 हजार रुपये हेक्टरी पिक विमा मिळतोय याच लालचे पोटी हे करण्यात आले अशी चर्चा आहे. लातूर सारख्या भागात भात पिकाची लागवड अतिशय दुर्मिळच आहे.
जेवरी येथील रहिवासी संभाजी तारे यांच्या मते "निलंगा तालुक्यातील अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान क्षेत्र आहे. त्याचाही विमा भरून लाभ घेण्याचा प्रकार घडू शकतो अशा दोषी लोकांचा वेळीच पर्दाफाश केला पाहिजे अन्यथा शासनाच्या जमीनीवर विमा भरून पैसे लाटण्याचा प्रकार घडू शकतो वेळीच वरीष्ठ स्तरावर चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.