Kolhapur Crime :'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'चा कोल्हापूर पोलिसांना विसर? महिलेला घरात घुसून बेदम मारहाण, हाॅटेलची नासधूस करूनही किरकोळ कलमांचा 'उतारा'
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच महिलांना नेमकी कोणती दुखापत केल्यानंतर की जीवानिशी संपवल्यानंतर गावगुंडाना अद्दल घडवणार? असा प्रश्न कोल्हापूर पोलिसांच्या वर्तनातून पडत आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एका बाजूने महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच महिलांना नेमकी कोणती दुखापत केल्यानंतर की जीवानिशी संपवल्यानंतर गावगुंडाना अद्दल घडवणार? असा प्रश्न कोल्हापूर पोलिसांच्या वर्तनातून पडत आहे. करवीर तालुक्यातील गिरगाव येथील एका महिलेच्या हाॅटेलमध्ये घुसून 5 जानेवारी रोजी संध्याकाळी दोन गावगुंडानी बेदम मारहाण केली. या मारहाणीत संबंधित महिला अत्यंत गंभीर जखमी झाली असून डावा डोळा थोडक्यात बचावला आहे. हाॅटेलची सुद्धा या दोन गावगुंडानी पूर्णत: नासधूस केली. संबंधित महिलेच्या मुलाला सुद्धा बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली.
घटना घडली तेव्हा पीडित महिलेचा पती आणि मोठा मुलगा घरी नसताना गावगुंडांनी येऊन महिलेच्या हाॅटेलमध्ये केवळ 700 रुपयांसाठी नासधूस केली. जीवांच्या आकांताने मदतीसाठी याचना करत असतानाही त्या महिलेची गावगुंडाच्या मारहाणीतून कोणीही सुटका केली नाही. इतका भीषण प्रसंग ओढावूनही ती महिला आठ दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
पोलिसांकडून जुजबी कारवाई
महिलेने गंभीर मारहाणीनंतर भावाला माहिती दिल्यानंतर भावाने पोलिसांना माहिती दिली. तसेच महिला आणि तिच्या मुलाला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिल्यांदा जुना राजवाडामधील पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी इस्पूर्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र, इस्पूर्ली पोलिसांनी महिलेला बेदम मारहाण होऊनही किरकोळ कलमं लावण्याचा पराक्रम केला आहे. या घटनेत महिलेला झालेल्या दुखापती आणि मारहा पाहता 307 आणि 354 कलम लावणं होत अपेक्षित होतं. मात्र किरकोळ कलमं लावली आहेत.
यामुळे हताश झालेल्या महिलेने एसपी शैलेश बलकवडे यांचीही भेट घेत न्यायाची मागणी केली. मात्र, अजूनही ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. गावगुंडाने केलेल्या मारहाणीनंतर इस्पूर्ली पोलिस ठाण्यातील रुबाब सुद्धा जग जिंकून आल्याप्रमाणेच होता. त्याने बेदम मारहाण केल्यानंतर व्हाॅट्सअॅप स्टेट्सही ठेवले होते. ते सुद्धा पोलिसांना दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे सायबर पोलिसांना यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी भावना दिसली नाही का? असाही प्रश्न उपस्थित होतो. ही घटना ताजी असतानाच तेथूनच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हाॅटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी पाचगावमधील डीजेच्या मुलाने त्याच्या साथीदारांसह हाॅटेलमध्ये नासधूस केली होती. त्यामुळे अशा प्रवृत्तींना कोल्हापूर पोलिस आळा घालणार की त्यांना रान मोकळे करून देणार? असा प्रश्न कोल्हापूर पोलिसांच्या वर्तनातून पडला आहे.
कोल्हापुरात महिला अत्याचारात वाढ
पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यातही फुटकळ कारवाई सुरु असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षात लैंगिक अत्याचाराची 197 घटना घडल्या होत्या. विनयभंगाच्या तब्बल 366 घटना घडल्या. 2021 च्या तुलनेत महिला अत्याचारात वाढ होत असतानाही पोलिस गावगुंडांवर जुजबी कारवाई करून त्यांना आणखी गुन्हे करण्यासाठी प्रेरित करत आहेत का? असाही प्रश्न निर्माण होतो.
नेमका काय प्रसंग घडला?
5 जानेवारी रोजी गुरुवारी संध्याकाळी 700 रुपये घेण्यासाठी गिरगावमधील गुंड प्रवृतीचा तरुण आणि त्याच्या साथीदारासह संबंधित महिलेच्या घरातच असलेल्या कोहिनूर हाॅटेलमध्ये आला होता. हे सातशे रुपये पीडित महिलेच्या मोठ्या मुलाने माल वाहतुकीच्या केलेल्या टेम्पोच्या भाड्याचे होते. त्यामुळे पैसे आताच हवेत म्हणत महिलेकडे पैशाची विचारणा केली. मात्र, महिलेने आता माझ्याकडे पैसे नाहीत, मुलाला विचारून देतो असे सांगितले.
मात्र, त्याने आताच हवेत म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. या वादावादीनंतर महिलेच्या डोळ्यावर प्रहार केल्याने महिला जागेवर कोसळली. यावेळी त्या महिलेचा छोटा मुलगा वाचवण्यास गेला असता त्यालाही मारहाण केली. दोघांना बेदम मारहाण करून हाॅटेलमधील साहित्याची आणि फ्रीजची नासधूस केली. शीतपेये सुद्धा फेकून दिली. गाडीही फोडून टाकली. यावेळी जीवाच्या आकांताने बाहेर आलेल्या महिलेला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या