Satej Patil : खासदार बालिश आहेत, त्यांच्याकडे प्राथमिक माहिती सुद्धा नाही; सतेज पाटलांचा महाडिकांवर हल्लाबोल
Satej Patil : आमदार सतेज पाटील यांनी गजापूर गावातील लोकांनी तीन दिवस अगोदरच अशी काही घटना होईल आणि आमच्या गावाला संरक्षण द्या अशी मागणी केली होती, असा दावा केला.
कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याला 14 जुलै रोजी गजापुरात झालेल्या हिंसाचारानंतर पाहण्यासाठी गेलेल्या खासदार शाहू महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलने खोटा व्हिडिओ व्हायरल केला असून त्या व्हिडिओबाबत आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. त्या व्हायरल व्हिडिओवर पाटील यांनी नेमका काय प्रकार घडला याबाबत सांगितलं. पाटील यांनी गजापूर गावातील लोकांनी तीन दिवस अगोदरच अशी काही घटना होईल आणि आमच्या गावाला संरक्षण द्या अशी मागणी केली होती, असा दावा केला. इंडिया आघाडीकडून आज कोल्हापुरात शाहू महाराजांच्या समाधीस्थळ ते शिवाजी चौक अशी सद्भभावना रॅली काढण्यात आली.
खासदार बालिश आहेत, त्यांच्याकडे प्राथमिक माहिती सुद्धा नाही
दरम्यान, सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले. खासदार बालिश आहेत, त्यांच्याकडे प्राथमिक माहिती सुद्धा नाही अशी टीका त्यांनी केली. आम्ही मदत विशाळगडावर केली असं त्यांना वाटतं, आम्ही मदत गजापुरात हिंसाचारग्रस्त इंडिया आघाडीकडून केली. अज्ञान असलं की अशी वक्तव्ये येतात, असे ते म्हणाले.
शाहू महाराज ऐकू येण्यासाठी ती कृती करत होते
सतेज पाटील म्हणाले, की विशाळगडावर महिलांच्या कानातील सुद्धा काढून घेतलं असे त्या सांगत होत्या. शाहू महाराज ऐकू येण्यासाठी ती कृती करत होते. महाराज मला सांगत होते की कानातलं सुद्धा काढून घेतले. मात्र, याचा विपर्यास करून ज्या पद्धतीने देशपातळीवर व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्याबाबतीत आम्ही रितसर गुन्हा दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या दौऱ्यावर काय म्हणाले?
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून विशाळगड होरपळत असताना आज प्रथमच सरकारचा प्रतिनिधी गडाच्या पायथ्याशी पोहोचला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विशाळगड दौरा केला. या दौऱ्यावरून पाटील यांना विचारण्यात आलं असता आम्हाला ते आल्याचे माहीतच नाही. प्रसारमाध्यमातून समजल्याची खोचक प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली. शासनाची भूमिका काय आहे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडून जाणून घ्यायला हवं होतं, असेही पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना पाटील म्हणाले की कोल्हापूरमध्ये झालेली दंगलीमध्ये बाहेरून आलेले लोक होते आणि आता पुण्यातून सुद्धा रवींद्र पडवळ बाहेर पडला आहे. यंत्रणेला माहीत होतं त्याचवेळी कारवाई करायला हवी होती अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की सामाजिक वातावरण बिघडवणारे दंगलींचे प्रकार राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच का घडत आहेत याची चौकशी पोलिस करत नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या