(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahu Maharaj : कोल्हापूर जोपर्यंत ताब्यात घेता येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र ताब्यात घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहिती; शाहू महाराजांची जोरदार टीका
छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील सर्वांना एकत्रित ठेवणारं समतेचं वातावरण बिघडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची टीका केली. पीडितांना केलेल्या मदतीवरून होत असलेल्या टीकेला सुद्धा उत्तर दिले.
कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागले हिंसक वळणामध्ये विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या विरोधात आज कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्यात आली. सव्वा वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरून सद्भावना रॅली शिवाजी चौकापर्यंत पोहोचली. यामध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीतील तसेच विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले.
तोपर्यंत महाराष्ट्र ताब्यात घेता येत नाही हे त्यांना निश्चित माहिती
रॅलीला प्रारंभ होण्यापूर्वी इंडिया आघाडीतील विविध नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील सर्वांना एकत्रित ठेवणारं समतेचं वातावरण बिघडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची टीका केली. शाहू महाराजांनी गजापुरात हिंसाचारग्रस्त पीडितांना केलेल्या मदतीवरून होत असलेल्या टीकेला सुद्धा उत्तर दिले. एमआयएमच्या मोर्चा बाबत त्यांना विचारले असता त्यांनी उद्या येणार असल्याचे कळवल्याचं शाहू महाराजांनी सांगितलं. कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून बदनाम केलं जात आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की निश्चितच कोल्हापूर जोपर्यंत ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ताब्यात घेता येत नाही हे त्यांना निश्चित माहिती असल्याची टीका शाहू महाराजांनी केली.
व्हिडिओतून दिशाभूल करणाऱ्यांना शाहू महाराजांकडून उत्तर
शाहू महाराज म्हणाले की, आपल्याला जेव्हा मनापासून वाटतं तेव्हाच आपण मदत करत असतो. दरम्यान, गजापुरात शाहू महाराजांना सतेत पाटील यांनी माफी मागायला लावली असा व्हिडिओ सोशल मीडियामधून व्हायरल केला जात आहे. मात्र, या व्हिडिओवरून शाहू महाराजांनी स्वतः घडलेला प्रसंग सांगत दिशाभूल करणाऱ्यांना उत्तर दिले. ते म्हणाले की, मी तो व्हिडिओ परत एकदा पहिला. त्यावेळी महिला आणि पुरुष जोरजोरात बोलत असल्याने कोणाचं कोणाला ऐकू येत नव्हतं. त्यामुळे मी कानावर हात ठेवून ऐकण्याची ती कृती केली होती. आम्ही माफी मागण्यासाठी गेलो नव्हतो, तर मदत करण्यासाठी गेलो होतो असे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या