Kolhapur Rain : अवकाळी पाऊस कोल्हापूर जिल्ह्याची पाठ सोडेना; ऊस तोडणीवर परिणाम होण्याची शक्यता
कोल्हापूर शहरातील काही भागासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे.
Kolhapur Rain updates : कोल्हापूर शहरातील (Kolhapur City) काही भागासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या परिसरात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. मागील आठवड्याच्या सुरवातीला पहिले तीन दिवस थंडी जाणवल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. आज सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचा दिसून आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धनेर्ली गावासह बामणी, शेंडूर, शंकरवाडी आदी गावात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस रात्री 8 पर्यंत सुरु होता. या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीत व्यत्यय येणार आहे. ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे या मजुरांचे हाल झाले. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गैरसोय झाली. या पावसाने शिवारात पाणी साचले. त्यामुळे ऊस तोडणीचे काम बंद राहणार आहे. दुसरीकडे, रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा व इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. या पावसामुळं हवेतला गारवा आणखी वाढला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट परतीचा पाऊस
दरम्यान, ऑक्टोबर महिना कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांसाठी कर्दनकाळ ठरला होता. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या ठिकाणी पाऊस कमी होणे अपेक्षित असताना तब्बल 129.2 मिमी पाऊस झाला होता. आजवरची आकडेवारी पाहिल्यास हाच पाऊस 60 मिमीच्या वर पडत नव्हता. यंदा मात्र पावसाने कहरच केला आहे. परतीच्या पावसाने सर्वाधिक कहर कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये केला होता. यामध्ये गगनबावडा, पन्हाळा, शिरोळ आणि हातकणंगले (Gaganbavda, Panhala, Shirol, Hatkanaglae) तालुक्यांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यात 282.9 मिमी पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यात 205 मिमी पाऊस झाला. शिरोळमध्ये 143.9 मिमी पाऊस झाला. पन्हाळा तालुक्यात 163.4 मिमी पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी देखील वाचा