Kolhapur News : पेरणी हंगाम संपत आला, कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा; भात, सोयाबीन उत्पादन घटण्याचा धोका
साधारणपणे मे महिन्याच्या उत्तरार्धात खरीपाच्या हंगामाला प्रारंभ होतो. मान्सूनपूर्व वळीव सरी कोसळतील या अंदाजाने शेतीमध्ये मशागत करून पेरण्या केल्या जातात. मात्र, यंदा जिल्ह्यात वळीव पावसाचा एकही थेंब कोसळला नाही.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल महिनाभर उशिराने मान्सून सक्रिय झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी किंचित सरी असाच प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु झाला आहे. पेरणीयोग्य पुरेसा पाऊस होत नसल्याने पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत.
खरीप पेरणीचा हंगाम संपत आला
साधारणपणे मे महिन्याच्या उत्तरार्धात खरीपाच्या हंगामाला प्रारंभ होतो. मान्सूनपूर्व वळीव सरी कोसळतील या अंदाजाने शेतीमध्ये मशागत करुन पेरण्या केल्या जातात. मात्र, यंदा जिल्ह्यात वळीव पावसाचा एकही थेंब कोसळला नाही. यानंतर मोसमी पाऊस तब्बल महिनाभर उशिरा आल्याने त्याचा थेट परिणाम खरिपातील पेरण्यांवर झाला आहे. सर्वसाधारणपणे खरीप हंगामात 30 जूनपर्यंत पेरण्या केल्या जातात. मात्र, जून महिना संपण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असतानाही पुरेशा आणि दमदार सरी कोसळलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणीला अजूनही म्हणावा तसा वेग आलेला नाही. खरीप हंगामात वेळेत पेरण्या न झाल्याने त्याचा थेट परिणाम भात आणि सोयाबीनवर होणार असून उत्पादन घटण्याचा धोका आहे. ऊसावरही विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात मान्सूनने केलेल्या विलंबामुळे रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्रात कोणत्याही प्रकारची पेरणी होऊ शकलेली नाही.
कोल्हापूर विभागात ऊस वगळून खरीप पिकाखालील क्षेत्र 7.28 लाख हेक्टर आहे. 21 जूनपर्यंत अवघ्या 0.23 लाख हेक्टरवर म्हणजेच आकड्यात सांगायचं झाल्यास 3.18 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पेरण्यांनी वेग घेतला असला, तरी पुरेशा पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.
शेतकरी निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला
जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने दमदार सलामी दिली आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, केवळ तुरळक पद्धतीचा पाऊस होत असल्याने परिणामी पेरणीयोग्य ओल जमिनीत न झाल्याने पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुसऱ्या बाजूला वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट येण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे शेतकरी निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला आहे. कृषी विभागाने यंदाच मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणांचे मोफत आणि अनुदानावर वितरण केले आहे. त्यात याचवर्षी पाऊस लांबल्याने कृषी विभागाच्या सोयाबीनची मूल्य साखळी वाढवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागण्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या