Kolhapur Congress MLA : कोल्हापूरच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काँग्रेस आमदारांकडून पालकमंत्र्यांना साकडे
Kolhapur Congress MLA : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस आमदारांकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले.
Kolhapur Congress MLA : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस आमदारांकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांची काँग्रेस आमदारांनी भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, राजू बाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, राजेश पाटील उपस्थित होते.
सर्किट बेंच त्वरीत सुरु करण्यात यावे
पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये तीर्थक्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी परिसर विकास आराखडा, शाहू मिलच्या जागेवर राजर्षि शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळसाठी निधी तसेच कोल्हापूर येथे खंडपीठ/सर्किट बेंच त्वरीत सुरु करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कामांना दिलेली स्थगिती उठवण्यात यावी
नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत संदर्भातील कामांना मिळालेली स्थगिती उठविणेत यावी व जागा उपलब्धतेचा निर्णय घेणेत यावा, कोल्हापूर जिल्हा क्रीडा संकुलाकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षि शाहू खासबाग कुस्ती मैदान संवर्धन करणेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधून कोल्हापूर शहरांतर्गत रस्त्यांसाठी निधी देण्यात यावा, राज्य शासनाच्या तेजस्विनी बस योजनेमधून महिलांसाठी बसेस उपलब्ध करुन देणेत याव्यात, आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
तसेच जोतिबा तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा, सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या शिवडाव-सोनवडे घाट रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशा कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातील विविध मागण्या काँग्रेस आमदारांकडून करण्यात आल्या.
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहचवूया
दरम्यान, कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघराण्याच्या मान्यतेने शासन सहभागाबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य दिव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहचवूया, असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव भव्य सोहळा (ग्रँड इव्हेंट) म्हणून साजरा करुन देश विदेशात पोहोचण्यासाठी प्रयत्न करुया, असे सांगून, या महोत्सवासाठी शासनाच्यावतीने 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
यावेळी शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा होण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत तसेच समाजातील सर्व घटकांच्या सहभागासाठीचे नियोजन, विविध सांस्कृतिक व अन्य उपक्रमांची रुपरेषा, महोत्सवाची व्यापक प्रसिध्दी, आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक ठिकाणांचे व मिरवणूक मार्गांचे सुशोभिकरण, नागरिक व पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या