Kolhapur Loksabha: कोल्हापूर लोकसभेची चुरस भलतीच वाढली; संजय मंडलिक, धनंजय महाडिक अन् 'आमचं ठरलंय' इतिहास जमा करत सतेज पाटील सुद्धा बोलले!
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी चुरस भलतीच दिवसागणिक वाढत चालली आहे. दुसरीकडे, पक्षादेश असेल त्याप्रमाणे जबाबदारी पार पाडणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.
Kolhapur Loksabha: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Lok Sabha Election) चुरस भलतीच दिवसागणिक वाढत चालली आहे. कोल्हापूरच्या दोन्ही जागा भाजपकडून स्वत:च्या पदरात पाडून घेण्याची चर्चा असतानाच शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडूनच लढणार असल्याचे म्हटले आहे. अमित शाह यांनी विद्यमान खासदारांनाच तिकीट देण्याचा शब्द दिल्याचेही मंडलिक यांनी सांगितले. भाजप खासदार धनंजय महाडिक माझाच प्रचार करतील, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, धनंजय महाडिक यांनीही भाजपने आदेश दिल्यास निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगत उत्सुकता वाढवली आहे. तसेच आपण भाजपचा सैनिक असल्याने पक्षादेश आल्यास कोणताही किंतु परंतु मंडलिकांचा प्रचार केला जाईल, असेही सांगितले. दुसरीकडे, 2019 मध्ये आघाडी धर्म मोडून आमचं ठरलंय म्हणून संजय मंडलिक यांना निवडून आणणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनीही आमचं ठरलंय हा इतिहास झाल्याचे म्हटले आहे. कोल्हापुरातील दोनपैकी एक जागा काँग्रेस लढण्यास इच्छुक असल्याचेही पाटील म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय झाल्याने कोणत्या पक्षाकडे कोणती जागा जाणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
महाडिक माझा प्रचार करतील; संजय मंडलिकांचा दावा
मागील निवडणुकीत धनंजय महाडिकांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटील यांनी आपली संपूर्ण यंत्रणा संजय मंडलिक यांच्या विजयासाठी लावली होती. मात्र, आता त्याच संजय मंडलिकांनी धनंजय महाडिक जुने मित्र असल्याचे सांगत माझाच प्रचार करतील, असा दावा केला आहे. मागील निवडणुकीत आम्ही विरोधात असलो, तरी त्यावेळी राजकारण वेगळे होते, असेही त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार हे दिशाभूल करणारे असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेस एका जागेसाठी इच्छूक
सतेज पाटील म्हणाले की, जिल्ह्यात काँग्रेसचे 5 आमदार असल्याने आम्ही लोकसभेची एक जागा लढवण्यास इच्छूक आहोत. सद्यस्थितीत महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडे असली, तरी संजय मंडलिक शिंदे गटात असल्याने दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागेल. आम्ही एका जागेसाठी इच्छूक असलो, तरी निर्णय वरिष्ठ घेतील. आमचं ठरलंय हा इतिहास झाला आहे. संजय मंडलिक भेटत असले, तरी त्यांच्याशी निवडणुकीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर मंडलिकांचाही प्रचार करणार
दुसरीकडे, पक्षादेश असेल त्याप्रमाणे जबाबदारी पार पाडणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. संजय मंडलिकांच्या प्रचाराचा आदेश आल्यास त्यांचाही प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:ला निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास त्यासाठी सुद्धा तयार असल्याचेही महाडिक म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या