Kolhapur Crime : कोल्हापूर शहरातील 'त्या' महिलेच्या खूनाचा उलगडा, गुप्तधनाच्या लालसेतून जीव गमावून बसली!
कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ भागातील रहिवासी असलेल्या आरती सामंत या 45 वर्षीय महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावातील शेतात आढळून आला होता.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ भागातील रहिवासी असलेल्या आरती सामंत या 45 वर्षीय महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावातील शेतात आढळून आला होता. घटना उघडकीस आल्यानंतर 24 तासांतच पोलिसांना संशयिताला अटक करण्यात यश आले आहे.
करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी आरती मंदिरात जाण्यासाठी घरातून निघाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला होता. त्याच दरम्यान, पाडळी खुर्द गावातील एका शेतकऱ्याला त्यांच्या शेतात आरतीचा मृतदेह आढळला.
ते पुढे म्हणाले की, शेतात मृतदेह दिसून आल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि एक टीम लवकरच घटनास्थळी पोहोचली. आर्थिक व्यवहारातून खून झाला असावा, अशी प्राथमिक होती. त्यानुसार, आम्ही घटनास्थळी पुरावे आणि मोबाईल लोकेशन ट्रेसिंगच्या आधारे राशिवडे गावातील बिरदेव मंदिरातील नामदेव पवार याला अटक केली.
गुप्तधनाच्या लालसेतून खून
संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान केला होता. हा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होत होती. संशयित आरोपी नामदेवकडे मृत आरती हिने गुप्तधन काढून दे, म्हणून तगादा लावला होता. दुसरीकडे नामदेवला पैशाची गरज होती. हे असतानाच आरती इतर व्यक्तींशी बोलत असलेले आवडत नसल्याने खून केल्याची कबुली संशयित आरोपी नामदेवने दिली आहे.
आरतीने गुप्तधनाचा तगादा लावल्यानंतर कंटाळून संशयिताने आरतीच्या डोक्यात वीट मारुन खून केला. त्यानंतर नामदेवने अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसुत्र, बांगड्या व मोबाईल असा मुद्देमाल चोरुन पोबारा केला होता. या प्रकरणी करवीर पोलिस अधिक तपास करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Deepak Kesarkar on kolhapur Dasara : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहचवूया, पालकमंत्री दीपक केसरकरांचे प्रतिपादन
- Gokul : ठाकरे-शिंदे वादात आता निष्ठावंत शिवसैनिकांची सुद्धा फरफट! कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमधील नियुक्ती रद्द