Gokul Milk Rate Hikes : दिवाळीच्या तोंडावर गोकुळचा दूध उत्पादकांना दिलासा; ग्राहकांना मात्र झटका!
Gokul Milk : दिवाळीच्या तोंडावर गोकुळने दूध उत्पादकांना दिलासा देताना ग्राहकांना मात्र झटका दिला आहे. गोकुळने म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 3 रुपये तर खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.
Gokul Milk Rate Hikes : दिवाळीच्या तोंडावर गोकुळने दूध उत्पादकांना दिलासा देताना ग्राहकांना मात्र झटका दिला आहे. गोकुळने म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 3 रुपये तर खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे. नव्या दराची अंमलबजावणी 21 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दुसरीकडे गायीच्या दुधाच्या खरेदी दरात 3 रुपयांनी वाढ होईल. गायीच्या दूध विक्री दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
म्हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45 रुपये 50 पैसे होता. तो आता 47 रुपये 50 करण्यात आला आहे. गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतिलिटर 32 रुपये होता, तो आता 35 रुपये राहील. दूध खरेदी दरात वाढ करून गोकुळने दूध उत्पादक शेतकर्यांना दिवाळीची भेट दिली आहे. गायीच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, मात्र विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे गोकुळचे (Gokul Milk Rate Hikes) अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
गेल्या सव्वा वर्षात दूध खरेदी व विक्री दरात सहा वेळा वाढ
गोकुळमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर गेल्या सव्वा वर्षात दूध खरेदी व विक्री दरात आतापर्यंत सहा वेळा वाढ करण्यात आली आहे. दूध पावडरची मागणी आणि किमती वाढल्यामुळे गोकुळने दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोकुळची दूध संकलनापेक्षा विक्री अधिक
दरम्यान, सध्या गोकुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन 13 लाख 15 हजार 410 लिटर आहे. विक्री 15 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कमी पडणारे दूध गोकुळकडून बाहेरून खरेदी केलं जात आहे. युक्रेनमधील युद्ध परिस्थितीमुळे दूध पावडरला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोकुळकडे 11 हजार टन दूध पावडरची मागणी आहे. परंतु गोकुळ ही मागणी पूर्ण करू शकत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
नव्या दरवाढीमुळे कोल्हापूरमध्ये म्हशीचे दूध ग्राहकांना 60 ऐवजी 63 रुपये लिटर या नव्या दराने उपलब्ध होईल. कोल्हापूरमध्ये म्हशीचे दूध ग्राहकांना 30 ऐवजी 32 रुपये अर्धा लिटर या दराने मिळेल. दुसरीकडे मुंबई, पुण्यात गोकुळच्या म्हशीच्या एक लिटर दुधाची किंमत 66 रुपयांवरुन आता 69 रुपयांवर जाईल. अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवरुन 35 रुपयांवर पोहोचली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या