(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : तर पशुसंवर्धन विभागाच्या दारात पायताण घेऊन जाब विचारणार, राजू शेट्टींचा इशारा
पशुपालकांचा हलगर्जीपणा सिध्द झाल्यास अशा पशुपालकाविरुध्द केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कारवाई करण्याचे संबंधित ग्रामपंचायतींना सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
कोल्हापूर : संभाव्य पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील पशुपालकांची जनावरे स्थलांतराअभावी पुरात वाहून गेल्यास व पशुपालकांचा हलगर्जीपणा सिध्द झाल्यास अशा पशुपालकाविरुध्द केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कारवाई करण्याचे संबंधित ग्रामपंचायतींना सक्त निर्देश देण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डाॅ. वाय. एस. पठाण यांनी दिली आहे.
या आदेशानंतर आता पुरबाधित गावांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आदेशावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कारवाईचा आदेश आल्यास पशुसंवर्धन विभागाच्या दारात पायताण घेऊन जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महापूर (Kolhapur Flood) बाधित गावातील जनावरे आम्ही मोकळ्या जागेत आणून सुरक्षित केली होती. मी स्वत:ही त्यामध्ये होतो. शेतकरी मुद्दाम आपली जनावरे पुरात सोडत नाही हे अधिकाऱ्यांच्या कधी लक्षात येणार ? आपल्या जनावरांना शेतकरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत असतो. महापुराने शेतकऱ्यांची अवस्था होते याची कल्पना देखील करू शकत नाही. घरात पाणी आल्याने कशी तारांबळ होते ते खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांना काय समजणार ? अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या जातील, आदेश मागे नाही घेतल्यास स्वाभिमानीकडून उत्तर दिले जाईल.
पशुसंवर्धन विभागाचा आदेश तो आहे तरी काय ?
पशूसंवर्धन विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, संभाव्य पूर परिस्थितीबाबत पशुसंवर्धन विभाग दक्ष असला, तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांचे योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणेची दक्षता घ्यावी. तसेच चारा व पशुखाद्याची योग्य ठिकाणी साठवणूक करावी.
यावर्षी संभाव्य पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील पशुपालकांची जनावरे स्थलांतराअभावी पुरात वाहून गेल्यास व पशुपालकांचा हलगर्जीपणा सिध्द झाल्यास अशा पशुपालकाविरुध्द केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कारवाई करण्याचे संबंधित ग्रामपंचायतींना सक्त निर्देश देण्यात आले आहेत. स्थलांतरित, छावणीतील जनावरांकरिता ग्राम स्तरावर चारा वाटप समितीचे गठण करण्यात आले आहे. याबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळाबाबत नियोजन असून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या दिमतीस अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या