Rajaram Sakhar Karkhana : अंगठी चिन्हाला विरोध ते उमेदवाराला रोखले; 'राजाराम'च्या मतदानासाठी वातावरण सकाळपासूनच 'टाईट'!
कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रावर आमदार सतेज पाटील गटाच्या विरोधी परिवर्तन आघाडीकडून बुथ लावण्यात आला आहे. या बुथवर लावण्यात आलेल्या अंगठी चिन्हावरून काही काळ तणाव निर्माण झाला.
Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सकाळपासून दोन्ही गटाकडून अत्यंत चुरस पाहण्यास मिळत आहे. कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रावर सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्राबाहेर आमदार सतेज पाटील गटाच्या विरोधी परिवर्तन आघाडीकडून बुथ लावण्यात आला आहे. या बुथवर लावण्यात आलेल्या अंगठी चिन्हावरुन काही काळ तणाव निर्माण झाला. अंगठी चिन्हावरून सत्ताधारी महाडिक गटाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे अंगठी चिन्ह काढून टाकण्यात आले.
समर्थकांची पोलिसांशी हुज्जत
दरम्यान, राजाराम कारखान्याच्या संस्था गटातील विरोधी परिवर्तन आघाडीचे उमेदवार सचिन पाटील यांना सेंट झेवियर्स येथील मतदान केंद्रात पोलिसांनी प्रवेशद्वारातून आत सोडले नसल्याने समर्थकांनी काही काळ पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळेही काही काळ मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक मतदारांना सहलीवर पाठण्यात आले आहे. त्यामुळे दुपारी मतदानाला वेग येण्याची शक्यता आहे.
महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले की, "महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. माझं कसं असतं धर की पकड आणि स्वारी घाल ते लगेच चिटपट कर. त्यामुळे माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी आहे, आमचा विजय निश्चित आहे."
महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार
दुसरीकडे, खासदार धनंजय महाडिक यांनीही विजय आमचाच असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही." ते पुढे म्हणाले की, संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावाही त्यांनी यावेळी केला.
राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या