Rajaram Sakhar Karkhana : महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार, निकाल सांगण्याची गरज नाही; धनंजय महाडिकांचा विश्वास
महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही. राजाराम कारखान्याची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

Rajaram Sakhar Karkhana : अवघ्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सत्ताधारी महाडिक आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महादेवराव महाडिक यांनी आमचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना महादेवराव महाडिक म्हणाले की, "महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. माझं कसं असतं धर की पकड आणि स्वारी घाल ते लगेच चिटपट कर. त्यामुळे माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी आहे, आमचा विजय निश्चित आहे."
महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार, निकाल सांगण्याची गरज नाही
दुसरीकडे, खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, "छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही." "राजाराम कारखान्याची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, मतदानाला प्रारंभ होतात काही ठिकाणी वजाबाकीचे प्रसंग घडल्याचे दिसून आले आहेत.
मतदानासाठी तगडा बंदोबस्त
या निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सतेज पाटील यांच्या बावड्यात तर महादेवराव महाडिकांच्या शिरोली पुलाचीमध्ये अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. मंगळवारी 25 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या 28 वर्षांपासून राजाराम कारखान्यावर महाडिकांची सत्ता आहे. सतेज पाटील गटाकडून सत्तांतर करण्यासाठी ईर्ष्येने प्रचार करण्यात आला. महाडिकांनी सुद्धा सत्ता राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महाडिकांसाठी आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माने गटही प्रचारात दिसून आला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
