(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान सुरु; दोन तालुक्यातील 'या' चार गावांवर असणार विशेष लक्ष
कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यातील कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 112 गावांमध्ये सभा, मेळावा या माध्यमातून प्रचार करण्यात आला आहे. सोशल मीडियाचाही दोन्ही गटाने तितक्याच ताकदीने वापर केला आहे.
Rajaram Sakhar Karkhana : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील (Kolhapur) छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला (Voting) सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यातील कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 112 गावांमध्ये सभा, मेळावा या माध्यमातून प्रचार करण्यात आला आहे. सोशल मीडियाचाही (Social Media) दोन्ही गटाने तितक्याच ताकदीने वापर केला आहे. प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कारखान्यासाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी 10 केंद्रावर 580 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानावेळी सहा विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे केंद्रे विभागून देण्यात आली आहेत.
किती जागांसाठी निवडणूक होणार?
दोन अपक्षांसह 44 उमेदवार रिंगणात आहेत. कारखान्याच्या पोटनियमानुसार विरोधी पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत (Election) चुरस वाढली आहे. राजाराम साखर कारखान्यासाठी संस्था गटातील एक व उर्वरित गटातील 20 अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. संस्था गटातून सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. संस्था गटातील 129 तर उत्पादक गटातील 13 हजार 409 असे 13 हजार 538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत.
दोन तालुक्यातील चार गावांवर लक्ष
सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून करवीर तालुक्यातील कसबा बावडा आणि गडमुडशिंगी आणि हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली आणि टोपवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बावडा हे सतेज पाटलांचे, तर पुलाची शिरोली महाडिकांचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे होम ग्राऊंडवरुन अधिकाधिक मते खेचण्यासाठी दोन्ही गटात सर्वाधिक चुरस आहे.
मतदानासाठी तगडा बंदोबस्त
या निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सतेज पाटील यांच्या बावड्यात तर महादेवराव महाडिकांच्या शिरोली पुलाचीमध्ये अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. मंगळवारी 25 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या 28 वर्षांपासून राजाराम कारखान्यावर महाडिकांची सत्ता आहे. सतेज पाटील गटाकडून सत्तांतर करण्यासाठी ईर्ष्येने प्रचार करण्यात आला. महाडिकांनी सुद्धा सत्ता राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महाडिकांसाठी आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माने गटही प्रचारात दिसून आला.
इतर महत्वाच्या बातम्या