(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजून महाडिक मजबूत, बंटी पाटीलला आमदार केलं ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक; महादेवराव महाडिकांचा हल्लाबोल
Rajaram Sakhar Karkhana : अजून महाडिक मजबूत, बंटी पाटीलला आमदार केलं ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक, महादेवराव महाडिक यांनी बंटी पाटलांवर साधला निशाणा.
Rajaram Sakhar Karkhana : बंटी पाटील याला आमदार केलं ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर हल्ला चढवला. राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभात बोलताना महाडिकांच्या निशाण्यावर फक्त सतेज पाटील राहिले. सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्यावर हल्ला चढवला.
घरी असून पळून जातो माणूस, जे असतं ते खरं सांगावं
महादेवराव महाडिक म्हणाले की, जंगलात एकच वाघ असतो, डरकाळी फोडली की जाग येते. अजून महाडिक मजबूत आहे, कुठंही यायला तयार आहे. घरी असून पळून जातो माणूस, जे असतं ते खरं सांगावं. बंटी पाटीलला आमदार केलं, ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. विद्यापीठ निवडणुकीत पुतण्या मुन्नाला डावलून बंटी याला संधी दिली, कारण मी शब्द दिला होता. कारखान्याला काही मंडळी सातत्याने त्रास देत आहेत. कारखान्याची वीज तोडण्यापर्यंत त्रास देण्यात आला. विरोधकांनी गडबड करू नये, वाघाची डरकाळी आली म्हणजे कळेल.आमच्या डोक्यावरच्या टोप्या पिवळ्या आहेत, तुमचं काय पिवळं होईल बघा.
पाहा व्हिडीओ : Mahadevrao Mahadik full speech Kolhapur: जंगलामध्ये एकच वाघ, सतेज पाटलांना खुलं आव्हान
बंटी पाटील हा कोल्हापूरला लागलेला शाप, शेतकऱ्यांसाठी तर कर्दनकाळ
खासदार धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शेलक्या शब्दात समाचार घेतला. राजारामच्या निवडणुकीत इतकं लीड द्या की बंटी पाटील यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची तलप नाही आली पाहिजे. ही केवळ राजाराम कारखान्याची निवडणूक नाही तर जिल्ह्यातून दृष्य प्रवृत्ती नष्ट करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. सारखं सारखं सांगतो मी पाटील आहे पाटील आहे. सतेज पाटील हा मनोरुग्ण व्यक्ती आहे, खोटारडा माणूस आहे. सूडबुद्धीने काम करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता राहिला आहे. सतेज पाटील तुमचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत होतील.
बंटी पाटील कोल्हापूरला लागलेला शाप आणि शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ असल्याची जहरी टीका केली. ते म्हणाले की, यांचं सगळं टक्केवारीवर चाललं आहे, कुठं आहे थेट पाईपलाईनचा कंत्राटदार? 29 उमेदवार अपात्र झाले, तर काळा दिवस आणि तुम्ही 1800 सभासद रद्द करायला निघाले होता तो सुवर्णकाळ होता का? अशीही विचारणा त्यांनी केली.
आम्हाला धमकी दिली तरी आम्ही घाबरत नाही
अमल महाडिक पुढे म्हणाले की, आम्हाला धमकी दिली तरी आम्ही घाबरत नाही, आणि बावड्यात येऊन फिरणारच. सतेज पाटील लिमिटमध्ये रहा आणि लिमिटबद्दल बोला. आम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांवर बोलत नाही. मात्र, तुम्ही महादेवराव महाडिक यांच्यावर बोलणं बंद करा अन्यथा जशास तसं उत्तर देऊ. बिंदू चौकात 7 वाजता येतो, तुम्ही देखील या. तुमच्या सोबत बोलणारे लोक तुमचे घात करणार आहेत. निवडणूक लागली की तुम्ही सभासदांच्या घरी जात असता, आम्ही त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. आमच्या सभासदांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.