Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा महाडिक गटाचा आरोप; विरोधी पाटील गटाकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रत्यारोप
कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी अंधाराचा फायदा घेत कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी 4 एप्रिल रोजी रात्री केल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी आरोप फेटाळला आहे.
![Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा महाडिक गटाचा आरोप; विरोधी पाटील गटाकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रत्यारोप Rajaram Sakhar Karkhana allegation of mahadik group of trying to enter rajaram karkhana counter reply from satej patil group Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा महाडिक गटाचा आरोप; विरोधी पाटील गटाकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रत्यारोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/06/180aa94a48f8d0c9c8ad7afaf6535fb41680758120657444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखाना निवडणूक दिवसागणिक अधिकच टोकदार होत चालली आहे. सत्ताधारी महाडिक गटाने विरोधकांनी अंधाराचा फायदा घेत घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे आज (6 एप्रिल) तक्रार दाखल करणार असल्याचे राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, या आरोपांना खोडून काढताना विरोधी पाटील गटाने सत्ताधाऱ्यांकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्याने काही प्रमुख कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळावर गेले, त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सगळीकडे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. पाटील गटाकडूनही पोलिसांना निवेदन दिलं जाणार आहे.
एक प्रकारे कारखान्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न
राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी म्हटले आहे की, अंधाराचा फायदा घेत कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी 4 एप्रिल रोजी रात्री केला. या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे कारखान्याच्या ताब्यात असलेली कागदपत्रे चोरून नेली जात असल्याचा संशय आहे. त्यांनी म्हटले आहे की, रात्री 11 च्या सुमारास काही कार्यकर्ते कारखाना परिसरात आले. यावेळी त्यांनी कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षरक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण या सुरक्षरक्षकालाच धक्काबुक्की करण्यात आली. हे सर्वजण विरोधी आघाडीचे कार्यकर्ते असावेत, वीस ते पंचवीस जणांनी रात्रीच्या अंधारात कारखान्यात जबरदस्तीने घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे कारखान्यावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. हा सर्व प्रकार कारखाना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. कारखाना परिसरात काही देवीच्या बुट्ट्या, बुक्का आणि इतर भानामती करण्यासाठीचे साहीत्यही आढळून आले, यावरून विरोधकांची मानसिकता दिसते.
पायाखालची वाळू सरकल्यामुळे चुकीचे आरोप
दरम्यान, दिलीप पाटील यांच्याकडून करण्यात आलेले आरोप विरोधी सतेज पाटील गटाने फेटाळून लावले आहेत. माजी नगरसेवक संदीप नेजदार यांनी सांगितले की, सत्ताधाऱ्यांकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्याने काही प्रमुख कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळावर गेले. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सगळीकडे उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांनी कोणालाही दमदाटी किंवा धक्काबुक्की केलेली नाही. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच दिलीप पाटील यांच्याकडून चुकीचे आरोप केले जात आहेत.
दरम्यान, सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांच्या अवैध ठरवण्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. आज (6 मार्च) सत्तारूढ महाडिक गटाकडून त्यांचं म्हणणं सादर केले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी 10 एप्रिलपर्यंत अवैध ठरलेले उमेदवारी पुन्हा वैध ठरणार की, अवैधच कायम राहणार या संदर्भातील निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)