Rajaram Sakhar Karkhana : सुंभ जळाला तरी पिळ कायम; राजाराम कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा बंटी विरुद्ध मुन्ना कलगीतुरा सुरु!
आम्ही महाडिक साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. त्यांनी दिलेला मंत्र आहे तो आम्ही पुढे घेऊन जात आहोत. योग्यवेळी त्याचा समाचार घेतला जाईल, अशी मी घोषणा करतो, असे धनंजय महाडिक म्हणाले.
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद साखर सहसंचालकांकडून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर सत्ताधारी महाडिक गट आणि विरोधी सतेज पाटील गटात वादाचा कलगीतुरा सुरु झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी तोफ डागल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्यावर 'रस्सी जल गयी लेकीन बल नहीं गया' म्हणत हल्ला चढवला. गुरुवारी संध्याकाळी दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्तीचा थरार रंगला. यावेळी बोलताना महाडिक यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
आम्ही महाडिक साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते
विरोधकांच्या टीकेचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल, असेही ते म्हणाले. दहीहंडी सोहळ्यात बोलताना महाडिक म्हणाले की, गोकुळ आणि राजारामचे राजकारण कानावर येत आहे, पण मी या विषयावर काही बोलणार नाही. 'रस्सी जल गयी लेकीन बल नहीं गया', असे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. या संदर्भात आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करु. आम्ही महाडिक साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. त्यांनी दिलेला मंत्र आहे तो आम्ही पुढे घेऊन जात आहोत. योग्यवेळी त्याचा समाचार घेतला जाईल, अशी मी घोषणा करतो.
तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती
दुसरीकडे, सभासद अपात्र ठरवण्यात आल्यानंतर सतेज पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये कारखान्याची निवडणूक झाली. यामध्ये कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला. आमच्या आघाडीच्या इच्छूक उमेदवारांपैकी 30 उमेदवारांचे अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवले. तरीही सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण 12,336 इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित 11,000 सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी 5000 ते 5500 मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिद्ध झाले आहे. या अपात्र सभासदांमुळे आमच्या उमेदवारांना 1200 ते 1250 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.
अवमान याचिका दाखल करणार
दरम्यान, प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न करता दिलेल्या या आदेशाविरोधात त्यांच्या विरुध्द सभासदांकडून अवमान याचिका दाखल करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा आम्ही या सभासदांना न्याय देण्यासाठी या निकाला विरोधात राज्य सरकारकडे अपिल करणार आहोत. प्रादेशिक सहसचालकांचा आदेश हा समासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधातील असून या निकालाला स्थगिती मिळविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :