(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Shivsena : पडद्यामागून शिंदे गटात गेलेले खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने अखेर प्रकटले! बंडखोरीवर शिक्कामोर्तब
शिवसेनेत बंडाळी करून मुख्यमंत्रिपद मिळलेल्या ठाणेकर बंडवीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात 12 खासदारही सामील झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना खासदारांचा समावेश आहे.
Kolhapur Shivsena : शिवसेनेत बंडाळी करून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या ठाणेकर बंडवीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात 12 खासदारही सामील झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना खासदारांचा समावेश आहे.
यामध्ये गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते सोनं म्हणणारे आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून बंदूक मारून दिल्लीत शिंदे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब केलेल्या खासदार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीच्या काळात काहीच कामे करता आली नाहीत, असे म्हणणारे धैर्यशील माने आज दिल्लीत 12 खासदारांच्या पाठिंबा दिलेल्या चमूमध्ये चमूमध्ये दिसून आले.
संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे बंडाळी करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा रंगली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. संजय मंडलिक यांनी शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर सातत्याने शिवसेनेसोबत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची आतून शिंदे गटाकडे त्यांचे कट्टर समर्थक बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून बोलणी सुरु होती. मतदारसंघातील आडाखा पाहून 2024 मध्ये भाजपच्या वळचणीने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी बंड केल्याचे स्पष्ट झाले आहे.
धैर्यशील माने यांनीही मतदारसंघात ऑडिओ क्लीप व्हायरल होईल याची व्यूहरचना करत शिंदे गटात जाण्याचे जवळपास निश्चित केले होते. गेल्या महिन्याभरापासून आपण भरपूर प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याचेही ते सांगत आहेत.
जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार
एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचल्यानंतर जिल्ह्यातून पहिल्यांदा त्यांच्या गळाला कोल्हापूरमधील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेनेच्या खात्यातून मंत्रिपद मिळवलेल्या अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर हे लागले. त्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही बंडखोरी करत शिंदे कळपात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार खासदार शिंदे गटात आणि निष्ठावंत शिवसैनिक दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील राजकीय चित्र पालटणार
महाडिक गटाला खासदारकी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले होते. मात्र, आता खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या बंडखोरीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर आणि पर्यायाने सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान असणार आहे. जिल्ह्यात आता महाडिक- कोरे-आवाडे-माने-घाडगे- मंडलिक विरुद्ध सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ असा सामना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Shivsena : कोल्हापूरमधील बंडखोर खासदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, कितीही बंदोबस्त लावला, तरी राजकीय वचपा काढणारच!
- Dhairyashil mane : एकनाथ शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु होताच खासादार धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त बहाल!
- Kolhapur News : महाडिक कंपनीकडून खादी ग्रामोद्योगाची जागा हडपण्याचा प्रयत्न, माजी नगसेविकेचा गंभीर आरोप
- Raju Shetti on GST : आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला कधी जीएसटी लावता? राजू शेट्टींचा बोचरा वार