Gokul Meeting : जाहीरपणे सांगूनही धनंजय महाडिकांची गोकुळच्या सभेला दांडी! सभेचा इतिहास पाहता थेट राजकीय संघर्ष टाळला?
Dhananjay Mahadik on Gokul : गोकुळच्या सभेसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीरपणे सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यामुळे सभेची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती.
![Gokul Meeting : जाहीरपणे सांगूनही धनंजय महाडिकांची गोकुळच्या सभेला दांडी! सभेचा इतिहास पाहता थेट राजकीय संघर्ष टाळला? MP Dhananjay Mahadik Avoid Gokul meeting despite committed to present Gokul Meeting : जाहीरपणे सांगूनही धनंजय महाडिकांची गोकुळच्या सभेला दांडी! सभेचा इतिहास पाहता थेट राजकीय संघर्ष टाळला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/674d67c40415c4ae5aa58d33faf8cae0166176660192988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gokul Meeting : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि तब्बल दोन वर्षांनी होत असलेली गोकुळची (Gokul) सत्तांतरानंतरची पहिलीच सभा अत्यंत गोंधळात आणि दोन्ही बाजूने होणाऱ्या घोषणाबाजीमध्येच संपली. सत्ताधारी गटाकडून शेवटच्या सभासदांचे समाधान होत नाही तोपर्यंत सभा चालवली जाईल, असे सांगण्यात आले होते. तथापि, गोंधळाने पाणी फेरले. सुमारे तासभर चाललेल्या सभेची राष्ट्रगीताने सांगता झाली. दुसरीकडे विरोधकांनी सभात्याग करत बाहेर येऊन समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
दरम्यान, गोकुळच्या सभेसाठी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik on Gokul) यांनी सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सभेची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. दहीहंडीच्या कार्यक्रमापासून धनंजय महाडिक आणि सतेज पाटील (Dhananjay Mahadik vs Satej Patil) यांच्यामध्ये रामायण महाभारताचा दाखला देत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे या वादाचे पडसाद गोकुळ सभेमध्ये उमटणार का? अशीही चर्चा रंगली होती.
धनंजय महाडिकांनी स्वतः हजर राहणार असल्याचे म्हटले होते
तथापि, धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या (Gokul) सभेला आज दांडी मारली. त्यामुळे गोकुळच्या सभांचा इतिहास पाहता थेट समोरासमोर येण्याचे टाळून राजकीय संघर्ष टाळला का? अशी चर्चा आता रंगली आहे. गोकुळच्या सभेसाठी तुम्ही हजर राहणार का? या प्रश्नावर धनंजय महाडिक यांनी स्वतः हजर राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, संचालिका शौमिका महाडिक यांनी सर्वसधारण सभेत एकहाती किल्ला लढवत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.
महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वीच सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी गोकुळची वाटचाल शेतकरी संघाकडे होत चालल्याचा आरोप केला होता. गोकुळच्या वाढलेल्या 450 संस्था केवळ दप्तरी असून सत्ताधाऱ्यांनी असे करू नये, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले होते.
तत्पूर्वी, कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये गोकुळची गोंधळामध्येच 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेसाठी सत्ताधारी गटाकडून सकाळी आठ वाजल्यापासून सभासद जमण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या सभासदांकडून हाॅल व्यापला गेला.
शौमिका महाडिकांकडून विरोधकांना जागा न ठेवल्याचा आरोप
सभागृह भरल्याने आणि शेवटच्या रांगेत बसावे लागणार हे लक्षात येताच विरोधक ठरावधारकांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याविरोधात सत्ताधारी गटाकडूनही घोषणाबाजी सुरु केली. संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोधकांना खूर्च्याही न ठेवल्याचा आरोप करत जिल्ह्यातून आलेल्या ठरावधारकांना जागा न दिल्यास उभारून प्रश्न विचारणार असल्याची भूमिका घेतली. तसेच मंचावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.
घोषणाबाजीमध्येच सभेला सुरुवात
शौमिका महाडिक यांचे आगमन झाल्यानंतर दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर सत्ताधारी गटाचे आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले. सतेज पाटील शौमिका महाडिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्वसाधारण सभेची प्रस्तावना सादर केली. यावेळी खालीच उभ्या असलेल्या शौमिका महाडिक यांनी न वाचता बोला, सभासदांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, अशी घोषणाबाजी केली. त्यांनी जोवर उत्पादकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर अहवाल वाचन करू नये, अशी भूमिका मांडली.
शौमिका महाडिक यांच्याकडून सभात्याग
सभेच्या सुरुवातीपासून आक्रमक राहिलेल्या शौमिका महाडिक यांनी सातत्याने प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा आरोप करत सभात्याग केला. त्यानंतर त्यांनी समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला.
त्या म्हणाल्या की, आमच्या गटातील ठरावधारकांना जागा दिली नाही, खूर्च्याही रिकाम्या ठेवण्यात आल्या नाहीत. आमचे या सभेतून समाधान झालं नसल्याचे सांगत संचालकांना सुद्धा बोलायची परवानगी मिळाली, तर दूध उत्पादकांना काय न्याय देणार? अशी विचारणा केली. आमचा माईक बंद करून ठेवण्यात आला. आम्हाला अहवाल नामंजूर आहे, प्रतिप्रश्न विचारू दिले नाहीत, त्यांच्याच लोकांना हातवारे करायला लावले. दिलेली उत्तरे खोटी आणि बनावट आहेत.
संघर्ष कायम राहण्याची चिन्हे
आजची सभा गोकुळची असली, तरी त्याला सतेज पाटील आणि महाडिक गटातील संघर्षाची त्याला किनार होती. संचालिका शौमिका महाडिक यांनी ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला ते पाहता आगामी राजकीय संघर्षाची आज ठिणगी पडली आहे यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)