(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hasan Mushrif on Satej Patil: तरच सतेज पाटील आणि आम्ही मित्र म्हणून राहू; मंत्री हसन मुश्रीफ थेटच बोलल्याने 'समझोता एस्क्प्रेस'चाच 'कंडका' पडणार?
मुश्रीफ यांनी आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला महायुतीसोबत राहावं लागेल, असे स्पष्ट करताना सतेज पाटील यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवरही भाष्य केले. त्यामुळे कोल्हापुरात आणखी खिचडी होणार आहे.
Hasan Mushrif on Satej Patil: राज्यात सलग दुसऱ्यांदा झालेल्या राजकीय भूकंपानंतर कोल्हापूरच्या (Kolhapur News) राजकारणाची खिचडी होऊन गेली असतानाच आता बंडखोर कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मुश्रीफ यांनी आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला महायुतीसोबत राहावं लागेल, असे स्पष्ट करताना सतेज पाटील यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवरही भाष्य केले. त्यामुळे कोल्हापूर राजकारणात आणखी खिचडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कोणाला कोणतं खातं मिळालं हे लवकरच कळेल
मंत्री हसन मुश्रीफ आज (14 जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना स्थानिक राजकारणावर भाष्य केले. त्याचबरोबर खातेवाटपावरही भाष्य केले. ते म्हणाले की, पुढील काही तासांमध्ये खातेवाटप झालेलं असेल. कोणाला कोणतं खातं मिळालं हे तुम्हाला लवकरच कळेल. शरद पवार आमचं दैवत असल्याचा पुनरुच्चार मुश्रीफ यांनी केला.
तरच आम्ही त्यांच्यासोबत मित्र म्हणून राहू
मुश्रीफ यांनी सांगितले की, आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला महायुती सोबत राहावं लागेल. सतेज पाटील महायुतीमध्ये आले तरच आम्ही त्यांच्यासोबत मित्र म्हणून राहू. मी खासगीत त्यांना आमच्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे, असा मोठा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूर राजकारणात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची जय वीरु अशीच ओळख आहे. त्यामुळे आता मुश्रीफ बंडखोर झाल्याने मैत्रीतही बंड होणार का? अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महाविकास आघाडी पॅटर्न या जोडीने राज्यात प्रथमच कोल्हापूर मनपा राबवला होता. गोकुळमध्येही पाटील-मुश्रीफ गटाची सत्ता आहे. जिल्हा बँक, बाजार समितीमध्येही दोघे एकत्र आहेत.
उद्धव ठाकरेंबद्दल जी भावना आहे तीच राहील
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मुश्रीफ यांनी अधिक भाष्य केले नाही. उद्धव ठाकरेंबद्दल जी भावना आहे तीच राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाळी केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आणि अटकेची टांगती तलवार असलेल्या हसन मुश्रीफ यांनीही बंडखोरी करत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ईडीच्या छापेमारीने त्रस्त झालेल्या मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आम्हालाच एकदाच येऊन गोळ्या घालून जा, अशी हताश होऊन प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले होते. नेमका हाच धागा पकडत ठाकरे यांनी मुश्रीफांवर अमरावतीमध्ये बोलताना बोचरा बाण सोडला होता. उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील सभेत या प्रसंगाची आठवण करून देत तेच मुश्रीफ भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत जाऊन बसल्याची प्रतिक्रिया दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या