Kolhapur Police: लाचखोरांचा वर्दीला कलंक सुरुच; आता एसपी ऑफिसमध्ये महिला सहाय्य कक्षातच लाच घेताना महिला कॉन्स्टेबल सापडली!
Kolhapur Crime: विशेष म्हणजे या महिला कॉन्स्टेबला कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयामधील महिला सहाय्य कक्षातच दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला रंगेहात पकडण्यात आले.
Kolhapur Crime: कोल्हापूर पोलिस दलात वर्दीला कलंक लावण्याचे प्रकार सुरुच असून आता महिला पोलिस कॉन्स्टेबल मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताची तयारी सुरु असतानाच थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात लाच घेताना सापडली. काजल गणेश लोंढे (वय 28, रा. पसरिचानगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. विशेष म्हणजे या महिला कॉन्स्टेबला कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयामधील महिला सहाय्य कक्षातच दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला रंगेहात पकडण्यात आले. कौटुंबिक वादामधील तक्रारीत समुपदेशनानंतर वाद मिटल्यावर तिने लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तिच्यावर कारवाई केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.
साधारण महिन्यापूर्वी पत्नीविरोधात कौटुंबिक वादाचा अर्ज महिला सहाय्य कक्षात दिला होता. या विभागात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल काजलने तक्रारदार पती आणि त्याच्या पत्नीस बोलवून समुपदेशन केल्यानंतर वाद मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी संध्याकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात सापळा लावला. महिला सहाय्य कक्षात लाच स्वीकारताच पथकाने काजलला रंगेहाथ पकडले. कार्यालयातच छापेमारी झाल्याने एकच खळबळ उडाली. पथकातील पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, संगीता गावडे, पूनम पाटील यांनी ही कारवाई केली.
काजल लोंढे 2014 पासून पोलिस दलात आहे. आठ महिन्यांपूर्वी तिची नियुक्ती कोल्हापुरातील महिला सहाय्य कक्षात झाली आहे. लाच घेताना सापडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने तातडीने तिच्या घरीही झडती घेतली. त्याठिकाणी विशेष काही हाती लागले नाही.
लाचप्रकरणी तलाठ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच, खरेदी केलेल्या जमिनीच्या व बँकेच्या कर्जाच्या दस्ताची फेरफार नोंद करण्यासाठी उमेदवाराकडून 20 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या साजणी-तिळवणीचा तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे आणि उमेदवार साहिल यासीन फरास या दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. जमिनीवर काढलेल्या बँकेच्या कर्जाच्या दस्ताची फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाचेची रक्कम उमेदवार साहिलला घेण्यास सांगितले होते. गावचावडीत लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लावलेल्या सापळ्यात साहिल फरास हा रंगेहाथ सापडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या