Almatti Dam Height : अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक; आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून सूचना
आंदोलकांनी निवेदन देऊन उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आंदोलक आणि पाटबंधारे वरिष्ठ अधिकारी यांची कोल्हापूरमध्ये बैठक करावी, अशी सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना केली.

Almatti Dam Height : कोल्हापूर, सांगलीत येणाऱ्या महापुरास अलमट्टी जबाबदार नाही ही बैठकीच्या सुरुवातीची शासनाची भूमिका होती, पण आंदोलकांनी याला जोरदार आक्षेप नोंदवून पुराव्यासह आलमट्टी कशी जबाबदार आहे हे ठासून सांगितल्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात आंदोलकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर अभ्यास करून येण्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांना आदेश दिले. दरम्यान, या बैठकीत विरोधी पक्षांच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. या मुद्यावरून आता पुढील बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊ, असे विखे पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी आंदोलकांनी निवेदन देऊन उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आंदोलक आणि पाटबंधारे वरिष्ठ अधिकारी यांची कोल्हापूरमध्ये बैठक करावी, अशी सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना केली.
कायदेशीर विरोध न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल
दरम्यान, या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावले नसल्याने माजी मंत्री सतेज पाटील हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बैठक संपल्यावर मंत्रालयाबाहेर संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत चर्चा करून सरकारची भूमिका चुकीची असल्याचे सांगितले. या महापुरास अलमट्टी जबाबदार असून या धरणाची उंची वाढव दिली जाणार नाही. सरकारने उंची वाढीला कायदेशीर विरोध न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा पाटील यांनी इशारा दिला. या बैठकीला कोल्हापूर सांगलीतील पालक मंत्री, सर्व आमदार पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.
आंदोलकांच्या वतीने आमदार अरुण लाड, माजी आमदार उल्हास पाटील इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, माजी सभापती बाजार समिती कोल्हापूर भारत पाटील, माजी सभापती करवीर राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, कृष्णा महापूर समितीचे सर्जेराव पाटील, दीपक पाटील, नागेश काळे, डॉ. अभिषेक दिवाण, दिनकर पवार उपस्थित होते.
आडमूठी भूमिका घेतल्यास डॅम इन्चार्जवर कायदेशीर कारवाई करावी
जागतिक बँकेने 3200 कोटी दिलेले आहेत त्यामध्ये कृष्णा नदीतील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवून महापुराचा प्रश्न संपवणार आहोत असं सरकारच्या सर्व आमदारांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकला उंची वाढवण्यास शासनाने कडाडून विरोध करावा. यावर्षी महापूर येऊ नये म्हणून केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे आलमट्टी धरण प्राधिकरणास पालन करण्यास लावावे, आडमूठी भूमिका घेतल्यास डॅम इन्चार्जवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली.
इतर महत्वाच्या बातम्या























