(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Filmfare Awards 2022 : कोल्हापूरच्या मर्दानी खेळाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर; राजर्षी शाहूंनी जपलेल्या शिवरायांच्या वारशाला सन्मान
सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या "वारसा" महितीपटाला 2022 चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार Best Film - Non Fiction या कॅटेगरीत मिळाला.
Filmfare Awards 2022 : सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या "वारसा" महितीपटाला 2022 चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार Best Film - Non Fiction या कॅटेगरीत मिळाला. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील ताज लँड एन्ड या सेवन स्टार हॉटेलमध्ये फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या फिल्मसाठी सलग दोन वर्षे रिसर्च व शूटिंगचे काम कोल्हापुरात झाले होते. कोल्हापूरच्या कला व क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू व त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत ते केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच. मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला.
या युद्धकलेच्या जोरावर शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत हे "वारसा" माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती,मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे.
आपली मुलं परदेशातील खेळ खेळतात कारण त्या खेळात करियर करता येते.आपल्या मातीतल्या या खेळाला शालेय क्रीडाप्रकारात कुठेलेच स्थान नाही. शासनाने मर्दानी खेळाला शालेय क्रीडाप्रकारात स्थान द्यावे. असं झाल्यास शिवरायांचा हा समृद्ध वारसा जपला जाईल, अशी इच्छा सचिन सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल 30 लाख खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. 2019 मध्ये सचिन सूर्यवंशी यांच्याच सॉकर सिटी या माहितीपटाला फिल्मफेअर मिळाला होता. आपल्या कोल्हापूरच्या सुपुत्राने तीन वर्षात दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.
- माहितीपटाचे नाव - वारसा
- लेखक, निर्माता, दिग्दर्शक - सचिन बाळासाहेब सूर्यवंशी
- निर्मिती - लेझी लिओ फिल्म्स
- सह-निर्माते - संदीप बंडा पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी
- नरेशन - डॉ. शरद भुताडीया
- संगीत - अमित पाध्ये
- सिनेमॅटोग्राफी - मिनार देव, सचिन सूर्यवंशी
- एडिट - प्रशांत भिलवडे
- साउंड डिझाईन- मंदार कमलापूरकर
- बीजीएम मिक्स - शुभम जोशी
- इलस्ट्रेशन्स- विनायक कुरणे
- अॅनिमेशन- किरण देशमुख
- कला - नितेश परुळेकर, सचिन सूर्यवंशी,
- व्हीएफएक्स - प्रदीपकुमार जाधव
- पब्लिसिटी - सचिन गुरव
इतर महत्वाच्या बातम्या