Mahavitaran Strike kolhapur : महावितरणमधील कोल्हापुरातील चार हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी; औद्योगिक वीज ग्राहकांमध्ये संभ्रम
Mahavitaran Strike Kolhapur : खासगीकरणाविरोधात महावितरणमधील तीस कामगार संघटनांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 4 हजारांवर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Mahavitaran Strike Kolhapur : खासगीकरणाविरोधात महावितरणमधील तीस कामगार संघटनांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur New Updates) 4 हजारांवर कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये बाराशे कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. महावितरण खासगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यात दरवाढ होण्याच्या भीतीने संप सुरू केला आहे. हा संप 72 तास होणार असल्याने बऱ्याच ठिकाणी बत्ती गुल होण्याची भीती आहे. दरम्यान, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे.
औद्योगिक वसाहती संभ्रमात
दुसरीकडे, वीज कंपन्यांच्या संपामुळे औद्योगिक वसाहतीमधील वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.औद्योगिक संघटनांना किंवा मोठ्या प्रमाणात वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना वीज कंपनीने कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांची संख्या लक्षात घेता वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिवस-रात्र कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते, तरीही विविध कारणांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो, मात्र संबंधित अस्थापनाची तक्रार येताच वीज कर्मचारी तक्रारीचे निवारण करत पुरवठा सुरळीत करतात. त्यामुळे या साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तत्काळ बडतर्फ करण्याचे आदेश
दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. दुसरीकडे, संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा विभागातील अभियंत्यांना विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे. महावितरणतर्फे नियुक्त ज्या एजन्सी संप काळात काम करणार नाहीत, त्यांना तत्काळ बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान,वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू केली आहेत. ती 24 तास कार्यरत राहणार आहेत. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे दिले आहेत.
फडणवीस तोडगा काढणार?
दरम्यान, संपात सहभागी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात चर्चा करणार आहेत. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या