Sangli News : सांगली शिक्षण संस्थेच्या 7 हजार 500 विद्यार्थ्यांकडून समूह गीते गात अमृतवंदना
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनी सांगली शिक्षण संस्थेतील 7 हजार 500 विद्यार्थ्यांनी 'अमृतवंदना' हा समूहगीतांचा कार्यक्रम सादर केला.
Sangli News : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनी सांगली शिक्षण संस्थेतील 7 हजार 500 विद्यार्थ्यांनी 'अमृतवंदना' हा समूहगीतांचा कार्यक्रम सादर केला. संस्थेच्या सांगली आणि हरिपूर येथील डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर सांगली, श्री. म. के. आठवले विनय मंदिर, सांगली, वसंत प्राथमिक शाळा, सांगली, कै. मो. द. बर्वे प्राथमिक शाळा, शिंदे मळा, सांगली, सिटी हायस्कूल, सांगली, हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली, श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली, कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला, सांगली, सौ. सुंदरबाई शंकरलाल मालू इंग्लिश मीडियम स्कूल, हरिपूर, उद्योगरत्न वेलणकर प्राथमिक शाळा, सांगली, सिटी इंग्लिश मीडियम स्कूल, सांगली या 11 शाळांमधील इयत्ता 3 री ते इयत्ता 9 वी मधील विद्यार्थ्यांचे इथे एकत्रित गीतांचे सादरीकरण होत आहे. इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होत असल्याने त्या मुलांचा यात समावेश होऊ शकला नाही.
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कामात राम आहे हा विचार सांगणारे, श्रमाची महती वर्णन करणारे 'काम करा काम करा काम हो' हे श्रीनिवास शिंदगी यांचे गीत 7 शाळांतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रतापा शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी.. देशाच्या रक्षणासाठी, न्याय नितीच्या पुनर्स्थापनेसाठी धर्माला जागविणारे, शिवरायांचे गुणगान गाणारे 'जय भवानी जय शिवराय' हे गीत 7 शाळांतील इयत्ता चौथी च्या 17 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी सादर केले.
'ही अनादी भरतभू, ही अनादी संस्कृती' हे गीत 7 शाळांतील इयत्ता पाचवीच्या 18 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी सादर केले. सांस्कृतिक आक्रमणांनी समाज जीवन विस्कटून गेले आहे. समाजाच्या उध्दारासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा विचार पेरणारे गीत 'चला निघूया सरसावोनी' आता 7 शाळांतील इयत्ता सहावीच्या 18 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी सादर केले.
झंझावाता पोटी येऊनी, पान हलेना हाताने, कलंक असला धुऊनी टाकणे, शिवरायांच्या राष्ट्राने, घनचक्कर या युध्दात, व्हा राष्ट्राचे राऊत, कर्तृत्वाचा या हात असे आवाहन करणारे मराठीतील पहिले ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर यांनी लिहिलेले 'रणी फडकती लाखो झेंडे' हे गीत 7 शाळांतील इयत्ता 7 वीच्या 18 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी सादर केले.
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर अल्पावधीतच अफजलखानरूपी दैत्य स्वातंत्र्य गिळण्यास चालून आला. अफजलखानरुपी काळ जिजाऊंना विचारतोय "बोल तुला स्वराज्य हवे की सौभाग्य त्यावर वीरमाता जिजाऊ न डगमगता म्हणतात 'कालियास मर्दण्यास कृष्ण सिध्द जाहला, केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला हे गीत 6 शाळांतील इयत्ता आठवीच्या 19 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी सादर केले.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होताना देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांनी जो मंत्र वेदमंत्राहुन प्रिय मानला त्या वंदे मातरम मंत्राचे सामर्थ्य प्रकट करणारे ग. दि. माडगूळकर लिखित 'वंद्य वंदे मातरम्' हे गीत 6 शाळांतील इयत्ता नववीच्या 19 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी सादर केले. पुण्यभूमी भारत, या भूमीतले अनामवीर, स्वातंत्र्यासाठी झगडलेले स्वातंत्र्यवीर या सर्वांना अभिवादन करणारे श्रीनिवास शिंदगी यांनी लिहिलेले 'आकाश हे आपुले हे' गीत संस्थेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित सादर केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
इतर महत्वाच्या बातम्या