Rajarshi Shahu Maharaj: स्मृतीशताब्दी पर्वाची सांगता; छत्रपती शाहू महाराजांसाठी उद्या 10 वाजता अवघं कोल्हापूर 100 सेकंदांसाठी स्तब्ध होणार
करवीरनगरी लोकराजाच्या दुरदृष्टीची शतकोत्तर कालावधीमध्येही फळे चाखत असताना याचे स्मरण चिरंतन व्हावे यासाठी स्मृतीदिनी उद्या (6 मे) सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात येणार आहे.
Rajarshi Shahu Maharaj: लोकराजा, समतेचे जनक, आरक्षणाचा पाया रचणारे, कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी पर्वाची सांगता उद्या (6 मे) होत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. करवीरनगरी लोकराजाच्या दुरदृष्टीची शतकोत्तर कालावधीमध्येही फळे चाखत असताना याचे स्मरण चिरंतन व्हावे यासाठी स्मृतीदिनी उद्या (6 मे) सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात येणार आहे.
समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे
शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार आणि कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया. या उपक्रमात आपण सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, बँकर्स, ग्राहक, बचत गटांचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. आपल्या लोकराजाला आदरांजली वाहण्यासाठी सर्वजण 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे. त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून आवाहन
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमुलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. दरम्यान, या उपक्रमात सर्व अबालवृद्धांसह सहभागी होवूया आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार पुढे नेऊ, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा ग्रंथाचे प्रकाशन
दरम्यान, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा’ या चरित्राचा अनुवाद रशियन आणि इटालियन या ग्रंथामध्ये केला आहे. या अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन उद्या सकाळी अकरा वाजता शिवाजी विद्यापीठातील सिनेट सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शाहू छत्रपती महाराज प्रमुख उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील.
शाहूचरित्राचा रशियन अनुवाद डॉ. मेघा पानसरे आणि प्रा. तत्याना बीकवा यांनी, तर इटालियन अनुवाद डॉ. अलेस्सांद्रा कोन्सोलरो यांनी केला आहे. प्रकाशन सोहळ्यात रशियन, इटालियन भाषेतील अंशमात्र वाचन केले जाणार आहे. शाहूप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :