Kolhapur Police : अंमली पदार्थ विरोधी समितीला व्यापक मोहीम राबवण्याचे पोलिस अधीक्षकांकडून निर्देश
युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी समितीला व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी (Kolhapur Police) दिले आहेत.
Kolhapur Police : कोल्हापूर जिल्ह्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी समितीला व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी (Kolhapur Police) दिले आहेत. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडली.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे. अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी तपासणी करा. गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. ते म्हणाले की, व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या आणि त्यांना असणाऱ्या व्यसनाधीनतेविषयीची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असणाऱ्या कारखान्यांमध्येही अशा पदार्थांचे उत्पादन होत नसल्याची तपासणी वेळोवेळी करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
शाळा, महाविद्यालये, बगीचा, सिनेमागृह, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होवू शकते, अशा परिसरावर विशेष लक्ष देवून अवैध कृती आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश बलकवडे यांनी या बैठकीत दिेले. दरम्यान, अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या युवक, व्यक्तींना समुपदेशन करुन त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री होताना आढळल्यास माहिती द्या
जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर 8411849922 व 0231-2662333 या क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावी. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले. यावेळी पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या