(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Pawar Exclusive : छत्रपतींनी असं बोलणं अशोभनीय, माझी विनंती आहे, असं करु नका, नाहीतर...; संजय पवारांचा संभाजीराजेंना इशारा
माझ्या पक्षावर कुणीही अशा पद्धतीने बोललं तर मी सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देणार असं सांगत शिवसैनिक हे सर्कशीतील वाघ नसल्याचं शिवसेना नेते संजय पवार म्हणाले.
कोल्हापूर: छत्रपती आमचे दैवत आहेत, आम्ही आजही त्यांचा सन्मान करतोय. पण शिवसेनेवर त्यांनी विनाकारण टीका करु नये, छत्रपतींना असं बोलणं अशोभनीय आहे असं शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी म्हटलं आहे. माझी छत्रपतींना विनंती आहे, हे असं करु नका, नाहीतर मीही त्याच पद्धतीने उत्तर देणार असंही त्यांनी संभाजीराजेंना विनंती करत इशारा दिला. राज्यसभेच्या निवडणुकीच्या नंतर संजय पवार पहिल्यांदाच एबीपी माझाशी बोलत होते.
राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर संभाजीराजे यांनी शिवसेनेवर टीका केली, शिवसेना भवनसमोर पोस्टर लावले. यावर प्रतिक्रिया देताना संजय पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर झालेला हा प्रकार दुर्दैवी आहे. मी स्वत: सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं. परंतु, आम्हचे छत्रपती, ज्यांना आम्ही देव मानतो, त्यांनी शिवसेनेवर टीका केली, ही गोष्ट चुकीची आहे. मी छत्रपतींना आजसुद्धा मान सन्मान देतोय. एका सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी दिली, तर शिवसेनेने त्याहून अधिक सन्मान छत्रपतींनी दिला. तुम्ही त्यांच्याकडे मतं मागण्यासाठी गेला होता.
संभाजीराजेंनी ट्वीट केलं त्याचं आम्हाला वाईट वाटलं. शिवसेनेचे वाघ हे जंगलातील वाघ आहेत, सर्कशीतील वाघ नाहीत. छत्रपतींनी हे असं बोलणं अशोभनीय आहे. आम्ही त्यांना विनंती करु, शिवसेनेवर विनाकारण टीका करु नका. छत्रपतींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कुठलातरी पक्ष शिवसेनेवर टीका करत आहे. संभाजीराजेंनी हे करु नये अशी माझी त्यांना विनंती आहे.
मराठा मोर्चे आपल्यामुळेच असा कुणीही गैरसमज करु नये
राज्यात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चावर बोलताना संजय पवार यांनी संभाजीराजेंना टोला लगावला. ते म्हणाले की, राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले, आम्हीसुद्धा त्यामध्ये होतो. त्यावर कुणीही असं समजू नये, माझ्यामुळे लाख मराठ्यांचे मोर्चे निघाले, असा कुणीही गैरसमज करू नये. माझ्या पक्षावर कुणीही अशा पद्धतीने बोललं तर मी सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देणार.
काम जोरदारपणे सुरू ठेवणार
राज्यसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला त्याचा शोध वरिष्ठ घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी फोन करून आधार दिला. मला ज्या पद्धतीने वरिष्ठांनी आदेश दिले आहेत, त्या पद्धतीने मी काम करणार आहे. या पुढे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार काम सुरू ठेवणार.