Kolhapur News: मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर, घरोघरी मतदार नोंदणी, मतदान कार्डवरील फोटोही बदलता येणार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार नोंदणी अधिकारी घरोघरी जावून मतदारांना याद्या दाखवतील. यादीमध्ये चूक असल्यास तर दुरुस्त करतील. नवीन मतदार नोंदणीही करतील.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुनर्निरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार याद्या दुरुस्ती, चुका कमी करणे, मतदारांचे नाव, छायाचित्रांच्या समावेशासाठी मतदार यादीचा विशेष कार्यक्रम होणार आहे. येत्या 21 जुलै ते 21 ऑगस्टदरम्यान मतदान नोंदणी अधिकारी घरी येऊन मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर 5 जानेवारी 2024 ला नवीन अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 31 हजार 122 मतदार आहेत. सर्वाधिक 4005 मतदार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात नोंद आहेत, तर सर्वात कमी 2267 मतदार कोल्हापूर उत्तरमध्ये नोंद झाली आहे. नव्याने मतदार नोंदणी वाढल्यानंतर हा आकडा बदलण्याची शक्यता आहे.
नवमतदारांचा समावेश होणार
1 जानेवारी 2024 रोजी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होईल, अशा नवमतदारांना आपली नावं मतदार यादीत समाविष्ट करता येतील. दरम्यान 1 एप्रिल 2024, 1 जुलै 2024 किंवा 1 ऑक्टोबर 2024 ला जरी ज्यांचे वय 18 पूर्ण होते, त्यांचाही मतदार यादीत नाव समावेश होईल. ज्या-त्या नवमतदारांचे तारखेनिहाय नाव यादीत समाविष्ट होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार नोंदणी अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांना याद्या दाखवतील. यादीमध्ये चूक असल्यास तर दुरुस्त करतील. नवीन मतदार नोंदणीही करतील. मयत व्यक्तीचे नाव कमी केले जाईल. याशिवाय इतर ठिकाणी स्थलांतर असेल, तर तशी नोंद केली जाईल. एका पत्त्यावरुन दुसऱ्या पत्त्यावर नाव बदल करु शकतील. यासाठी अर्ज किंवा फॉर्म नोंदणी अधिकाऱ्यांकडे असतील.
ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम असेल. मतदारयादीत माहिती बदलण्यासाठी यंत्रणा काम करेल. यामध्ये मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आपली अद्यावत माहिती देता येईल. मतदान कार्डवरील फोटो बदलायचा असेल तर बदलून नवीन मतदान कार्ड घेता येईल. यासाठी नोंदणी अधिकाऱ्यांकडे सर्व योग्य माहिती द्यावी. मतदार यादीवरील आक्षेप 17 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबरपर्यंत घेता येईल. आक्षेपानंतर 26 डिसेंबरपर्यंत निकालात काढले जाईल.
असे असेल मतदान नोंदणीचे नियोजन
- घरोघरी मतदान नोंदणी, दुरुस्ती : 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023
- मतदान केंद्र सुसूत्रीकरण : 22 ऑगस्ट 2023 ते 29 सप्टेंबर 2023
- अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध : 5 जानेवारी 2024
इतर महत्वाच्या बातम्या