(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक करता येणार
बेळगांव, कर्नाटक येथुन गुगल मॅपवर गोव्यास जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातुन दाखवतो. त्यामुळे वाहन चालक या घाटातून प्रवास करतात. परंतु घाटाचा अंदाज चालकाला येत नाही.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News)चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी- भेडशी ते राज्य हद्दीमधील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 अखेर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतुक नियंत्रित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी रोडच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधून एसटी वाहतुक सुध्दा सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक
चंदगड पोलीस ठाणे हद्दीतून बेळगांव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारीनगर या मार्गावरुन येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात होते. हा घाट हा खुपच अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात. घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक असुन घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांचा टर्न बसत नाही. त्यामुळे घाटामध्ये अनेक मोठे अपघात झाले आहेत. घाटामध्ये अवजड वाहतुकीमुळे तीव्र वळणांवर वाहन अडकून राहते व वाहन काढण्यासाठी क्रेन घेवून जाणे सुध्दा अवघड होते. मोठ्या क्रेनचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास क्रेनचा सुध्दा अपघात झालेल्या घटना घडल्या आहेत.
बेळगांव, कर्नाटक येथुन गुगल मॅपवर गोव्यास जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातुन दाखवतो. त्यामुळे वाहन चालक या घाटातून प्रवास करतात. परंतु घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. गुगल मॅपवरुन परराज्यातू येणाऱ्या अवजड वाहनांवरील चालक हे या घाटाचा अंदाज नसतानाही अवजड वाहन तिलारी घाटातून घेवून जाण्याचे धाडस करतात त्यामुळे अपघाताच्या घटना व वाहने घाटामध्ये अडकुन राहण्याच्या घटना घडतात. त्यामुळे मोटरसायकल व इतर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीस अडथळा होतो.
अवजड वाहतुकीसाठी दोन पर्यायी मार्ग उपलब्ध
तिलारी घाटातुन होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आंबोली घाट तसेच कर्नाटक राज्यातील चोर्ला घाट असे दोन पर्यायी मार्ग आहेत. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा- आंबोली ते बांदा या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून 30 जून 2024 अखेर महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. तसेच उत्तुर-आजरा-आंबोली मार्गे सावंतवाडी ते गोवा अशी वाहतुक देखील या मार्गावरुन होऊ शकते. या पर्यायी महामार्गावरुन अवजड वाहतूक वळविण्यास हकरत नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या