Kolhapur News : डोंगरावर जळत होती चिता अन् संशय बळावला, पण उलघडा होताच प्रकार समोर आला तिसराच!
कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील लाड चौकात राहणाऱ्या श्वान प्रेमी सुनीत शुक्ला यांच्या कुत्र्याचे निधन झाले. लाडक्या कुत्र्याचे निधन झाल्यानंतर आपल्या शेतात दहन केल्याचा खुलासा शुक्ला यांनी केला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील वाघजाई डोंगरावर गुरुवारी (18 ऑक्टोबर) रोजी सरण रचून अग्नी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. डोंगरावर चिता जळत असल्याने अनेकांचा संशय बळावला. त्यामुळे हा घातपात तर नाही ना? अशीच चर्चा परिसरात रंगली होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला आहे.
वाघजाई डोंगरावर सरण रचून चितेला अग्नी दिल्याचा प्रकार एका महिलेसह पाच अज्ञात व्यक्तींनी केला होता. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील लाड चौकात राहणाऱ्या श्वान प्रेमी सुनीत शुक्ला यांच्या कुत्र्याचे निधन झाले. लाडक्या कुत्र्याचे निधन झाल्यानंतर आपल्या शेतात दहन केल्याचा खुलासा शुक्ला यांनी केला. या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी सादर केल्याने संशयकल्लोळावर पडदा पडला.
शुक्ला यांनी आपल्या लाडक्या कुत्र्याचे निधन झाल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हापुरात स्मशानभुमीत सोय झाली नसल्याने वाघजाई डोंगरावर आम्ही अंत्यसंस्कार व विधी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याचे व्हिडिओही त्यांनी दाखवले.
चिता जळताना दिसल्याने शंकेची पाल चुकचुकली
गुरुवारी वाघजाई डोंगरावर कळबेंचा दरा नावाने असलेल्या भागात सरण रचून चिता जाळल्याची चर्चेनं घबराट पसरली होती. त्यामुळे घातपाताची शक्यतेनं संशय व चर्चेला उधाण आले होते. काहींनी जागेवर जाऊन पाहणी केली. कळंबे, भामटे गावात याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली होती.
बेरोजगार इंजिनिअरने कॉलनीतील म्हातारीच्या डोक्यात घातला दगड
दरम्यान, गांजाबाज बेरोजगार सिव्हील इंजिनिअरने काॅलनीमधील वृद्ध महिलेनं दारु पिताना दुसऱ्यांदा पाहिल्याने तिचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. सुभाषनगर येथील रोहिदास कॉलनीत राहणाऱ्या लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय 70) यांचा निर्घृण खून झाला होता. यानंतर काही तासांमध्ये खुनाचा उलगडा झाला.
पोलिसांनी प्रतीक विनायक गुरुले (वय 24, रा. रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) याला अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेला प्रतीक पुर्णत: गांजाबाज झाला होता. त्यामुळे नशेमध्येच राहत होता. याच नशेबाज प्रतीकला काही दिवसांपूर्वी मयत लक्ष्मी क्षीरसागर यांनी दारू पिताना पाहिले होते. त्यांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर प्रतीकच्या घरी वाद झाला होता. यानंतर पुन्हा प्रतीक दारू पिताना त्यांनाच दिसला. त्यामुळे त्यांनी दारू पिऊ नको, नाही तर घरी सांगेन, असे त्या वृद्ध माऊलीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि घात झाला.
इतर महत्वच्या बातम्या