(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: तोपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नका; कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मान्सूनच्या चालू हंगामात जून महिन्यातील 21 दिवस उलटूनही मौसमी पावसाला जिल्ह्यात सुरुवात झालेली नाही. शेतीच्या मशागतीसाठी अत्यावश्यक असलेला एप्रिल व मे महिन्यामध्ये वळीव पावसाचा थेंबही कोसळला नाही.
Kolhapur News: किमान सलग तीन दिवस अथवा 65 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस होवून जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा तयार झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मान्सूनच्या चालू हंगामात जून महिन्यातील 21 दिवस उलटूनही नैऋत्य मौसमी पावसाला जिल्ह्यात सुरुवात झालेली नाही. शेतीच्या मशागतीसाठी अत्यावश्यक असलेला एप्रिल व मे महिन्यामध्ये वळीव पावसाचा थेंबही कोसळला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी जमिनीच्या मशागती पूर्ण झालेल्या नाहीत.
कोल्हापूर जिल्ह्यात फक्त 5 टक्के पावसाची नोंद
जून 2023 चे सरासरी पर्जन्यमान 367.90 मिलीमिटर इतके आहे. मात्र 19 जून 2023 अखेर फक्त 18.30 मिलीमिटर (5 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पाऊस झाला नसल्याने जमिनीमध्ये पुरेशी ओल तयार झालेली नाही. आवश्यक प्रमाणात पाऊस न झाल्यास याचा परिमाण पेरणी होवून उगवण झालेल्या पिकांना धोकादायक ठरु शकतो. जिरायती क्षेत्रावरील सोयाबीन, भुईमुग या पिकांच्या पेरण्या विलंबाने होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच भाजीपाला पिके, चारा पिके यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे खरीप हंगामातील पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 92 हजार 633 हेक्टर आहे. त्यामध्ये भात, नाचणी, भुईमुग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी लागवड व सन 2023-24 मध्ये गाळप हंगामासाठी 1 लाख 88 हजार 90 हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे. पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये भाताची धुळपवाफ पेरणी केली जाते. शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व भुईमुग या पिकाची पेरणी केली जाते. 14 जून 2023 पर्यंत एकूण 12 हजार 519 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या फक्त 7 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे नजरअंदाजावरुन दिसून येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी कळविले आहे.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच प्रमुख नद्यांमध्ये पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी उपसाबंदीचा खेळ सुरू असल्याने उभी पिके संकटात आली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतातील ऊस हा उन्हाने करपून गेला आहे, त्यामुळे उघड्या डोळ्याने ऊस करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
भाताची पेरणी संकटात
दुसरीकडे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक शेतकर्यांनी भात पेरणी केली आहे. मात्र, ही पेरणी आता पूर्णतः संकटात आली आहे. भुईमूग, सोयाबीनची पेरणी झालेलीच नाही. पाऊस लांबत गेल्याने ऊडीद, मुगासारख्या आंतरपीकांवरही विपरित परिणाम होणार आहे. गेल्या अठरा ते वीस दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हलकासा शिडकावा सोडता कोणत्याही प्रकारचा पाऊस झालेला नाही. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही पाऊस झालेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या