Hasan Mushrif : हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या
संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी व इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Hasan Mushrif : संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी व इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे खोटी व बदनामी करणारी फिर्याद दाखल केल्याचे सांगत ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला.
सन 2012 ते आजअखेर हा गुन्हा घडल्याची फिर्याद दिली आहे. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले व सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कुलकर्णीं यांच्यासह अन्य सभासदांना महिन्याला पाच किलो साखर, तसेच लाभांश रूपात अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविण्यात आली. कारखाना सुरू झाल्यावर साखर कार्ड बिगर ऊस उत्पादक या सदराखाली देण्यात आले. विवेक कुलकर्णी व साक्षीदार यांना कोणतीही पावती, शेअर सर्टिफिकेट दिले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता त्यांना सरसेनापती शुगर ‘एलएलपी’ या नावाने पोच पावत्या देण्यात आल्या. ‘नॉन क्युम्युलेटी व प्रेफरेंशियल शेअर्स’ या सदराखाली या पोच पावत्या दिल्याचे दिसून आले. कारखाना उभा करताना रोख, धनादेश स्वरूपात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कागलमधील शाखा क्रमांक एक व दोनमधून त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यक्तिगत तसेच सरसेनापती शुगर पब्लिक लिमिटेड (नियोजित)च्या नावाने आमच्याकडे भाग देतो, असे सांगून पैसे गोळा केलेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या
दरम्यान, आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तसेच काही शेतकरी मुरगूड पोलिस ठाण्याकडे आले. चुकीची व बिनबुडाची तक्रार शहानिशा न करता कशी दाखल करून घेतली, त्यासाठी कोणती कागदपत्रे पुरवण्यात आली, असा जाब सहायक निरीक्षक बडवे यांना विचारला. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. संतप्त कार्यकर्त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात हुकूमशाही सुरू झाल्याचा आरोप केला. आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात एक व्यक्ती 40 कोटींची तक्रार करते आणि त्याची शहानिशा न करता गुन्हा दाखल कसा करून घेतात, सर्व 40 हजार शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे काय? 10 ते 15 जण येऊन 40 हजार शेतकऱ्यांची तक्रार कशी देऊ शकतात, असा जाब यावेळी विचारण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
