(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: पंचगंगा नदीत बुडणाऱ्या लातुरमधील 4 महिलांना जीवदान, जीवरक्षकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
Kolhapur News: जीवरक्षक उदय निंबाळकरासह नागरिकांनी चारही महिलांना पाण्यातून बाहेर काढले. यातील दोन महिलांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. हा प्रकार शनिवारी सकाळी घडला.
Kolhapur News : मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या चार महिला पंचगंगेत बुडत असताना जीवरक्षकांनी सतर्कतेने वाचवल्याने अनर्थ टळला. दोन महिलांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. माधुरी दत्ता अंबाडे (वय 35 वर्षे, रा. आरणे, जि. लातूर), कोमल सुरेश क्षीरसागर (वय 45 वर्षे), शामल राजकुमार क्षीरसागर (वय 50 वर्षे), मंगल सुरेश मगर (वय 45 वर्षे) या महिलांची नावं आहे. जीवरक्षकांनी दाखवलेल्या धाडसाने या चारही मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या.
जीवरक्षक उदय निंबाळकरासह नागरिकांनी चारही महिलांना पाण्यातून बाहेर काढले. यातील दोन महिलांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. हा प्रकार शनिवारी (13 मे) सकाळी घडला. लातूरमधील क्षीरसागर कुटुंबीय नातेवाईकांसह अंबाबाई दर्शनासाठी शनिवारी पहाटे कोल्हापूरमध्ये आले होते. पंचगंगेत स्नान करुन अंबाबाईचे दर्शन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
एकीला वाचवण्याच्या नादात चौघी पाण्यात
नऊ जण आंघोळीसाठी पंचगंगेवर गेल्यानंतर माधुरी अन्य तीन महिलांसह स्नान करत असताना माधुरी यांचा पाय घसरुन खोल पाण्यामध्ये पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी कोमल पुढे गेल्या. त्या सुद्धा तोल जाऊन पाण्यामध्ये पडल्या. या दोघींना वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या शामल आणि मंगलही बुडू लागल्या. एकाचवेळी चार महिला बुडू लागल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर जीवरक्षक उदय निंबाळकर यांच्यासह विनायक जाधव तसेच अजिज शेख घाटावर व्यायाम करत असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उड्या घेत माधुरी यांच्यासह तिघींना मोठ्या धैर्याने बाहेर काढले. चार महिलांना बाहेर काढताना जीवरक्षकांची चांगलीच दमछाक झाली. प्रसंगावधान राखून इनर ट्यूब टाकण्याची सूचना निंबाळकर यांनी शेख यांनी केली. इनर ट्यूबद्वारे बुडणाऱ्या महिलांना पाण्याबाहेर काढण्यात आले.
पाण्यातून बाहेर काढल्यानंतर चारही महिलांना उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. माधुरी आणि कोमल यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने अत्यवस्थ झाल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या