(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Ncp: बाप माणसाला या वयात रस्त्यावर उतरायला लावणाऱ्यांना धडा शिकवू; कोल्हापुरात पक्ष मजबूत करण्यासाठी 16 जुलैला शरद पवार गटाचा मेळावा
ज्या शरद पवार यांनी पद, प्रतिष्ठा, नाव मिळवून दिले, त्या 'बापमाणसा'ला या वयात रस्त्यावर उतरायला लावणाऱ्यांविरोधात ताकदीने लढा देण्याचा निर्धार कोल्हापुरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला.
Kolhapur Ncp: आमदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जात मंत्रिपदाची शपथ घेतली. मुश्रीफांसोबत गेलेल्या कोल्हाूपर जिल्ह्यातील (Kolhapur News) पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात केली. कोल्हापुरात पुन्हा पक्ष बांधून दाखवू आणि त्यासाठीचे नियोजन येत्या रविवारी 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीर करू असे व्ही.बी. पाटील म्हणाले. पक्ष संघटन मजबूत करण्यासह शरद पवार यांच्यासोबत भक्कम राहण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली. विशेष म्हणजे व्ही. बी. पाटील यांच्या खांद्यावर (10 जुलै) पक्षाकडून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ताकदीने लढा देण्याचा निर्धार
मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापुरातील अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत गेल्याने पक्षात फूट पडली आहे. ज्या शरद पवार यांनी पद, प्रतिष्ठा, नाव मिळवून दिले त्या 'बापमाणसा'ला या वयात रस्त्यावर उतरायला लावणाऱ्यांविरोधात ताकदीने लढा देण्याचा निर्धार कोल्हापुरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. ज्यांना अजून पक्षातून बाहेर पडायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. आम्ही नवीन निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी उभारून पक्ष संघटन मजबूत करु, असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
16 जुलैला पक्षाचा मेळावा
पक्ष सोडून गेलेल्यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ आणि त्यासाठीचे नियोजन रविवारच्या 16 जुलैला मेळावा घेण्यात येणार असल्याचे व्ही. बी. पाटील यांनी जाहीर केले. बंडखोर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह अनिल साळोखे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र चव्हाण यांची पक्ष आणि पदावरून हकालपट्टी करावी, अशीही मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सुमारे 3 हजार क्रियाशील कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार असून. त्यासाठी तालुकानिहाय कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले.
यावेळी माजी आमदार राजीव आवळे, माजी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शहराध्यक्ष आर के पवार, अमर चव्हाण, लखन बेराडे, नितीन जांभळे, जयकुमार शिंदे, रामराजे बदाले, चंद्रकांत वाकळे, प्रकाश पाटील, सरोजिनी जाधव, अश्विनी माने, जहिदा मुजावर, शिवानंद तेली, आबा पाटील, मुकुंद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल घाटगे यांनी स्वागत केले. यावेळी रोहित पाटील, हिदायत मणेर, गणपतराव बागडी, निरंजन कदम, रमेश पोवार, शितल तिवडे आदी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या