(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : डुकरांच्या चोरून शिकारीसाठी वीजेची तार लावली अन् खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा शाॅकने जीव गेला
पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह सापडले आहेत. ऐन दिवाळीत घटना घडल्याने सन्नाटा पसरला आहे. याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पन्हाळा (जि. कोल्हापूर) : भर दिवाळीत थरकाप उडवणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) पन्हाळा तालुक्यातील (Panhala) राक्षीमध्ये उघडकीस आली आहे. खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या चोरून शिकारीसाठी ( electric wires set up for hunting pigs in panhala taluka) लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जोतिराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60, दघे रा. राक्षी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या दोन सख्ख्या भावांचा करुण अंत झाला.
बुधवारी (8 नोव्हेंबर) रोजी रात्री घडलेल्या र्घटनेचा आज सोमवारी (13 नोव्हेंबर) चार दिवसांनी सकाळी उलगडा झाल्याने भर दिवाळीत अंगाचा थरकाप उडाला आहे. चोरून शिकारीसाठी वीजेच्या तारा लावून मृतदेह फेकून देणाऱ्या सहा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दोघा भावांचे मृतदेह सापडले
पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह सापडले आहेत. ऐन दिवाळीत घटना घडल्याने सन्नाटा पसरला आहे. याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी तलावाच्या जवळच विजेचा शाॅक देऊन चोरटया शिकारी केल्या जातात. याच प्रकारातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दोघे भाऊ बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक व गावकरी मागील चार दिवसांपासून शोध घेत होते.
डुकरांच्या शिकारीसाठी विद्युत तारा
दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोतिराम कुंभार आणि नायकू कुंभार हे सख्खे भाऊ बुधवारी रात्री खेकडं पकडण्यासाठी धरणाचा ओढा भागात गेल्यानंतर घरी परत आले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलांनी खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या परिसरात शोध सुरू केला. शोध घेण्यासाठी ड्रोनची सुद्धा मदत घेण्यात आली, पण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी दोघे बेपत्ता असल्याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी बेपत्ता भावांचा तपास सुरु केल्यानंतर धरणाचा ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकरांच्या शिकारीसाठी वीजेच्या तारा लावल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केल्यानंतर कुंभार बंधूंचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शिकारीसाठी तारा लावणाऱ्या सहा जणांनी कुंभार भावांचा मृत्यू झाल्याने घाबरून ही घटना कोणालाही कळू नये, यासाठी मृतदेह जंगलात फेकले होते.
इतर महत्वाच्या बातम्या