Kolhapur Crime : वडिल चारचाकी वळविताना पाठीमागून चिमुरडी धावत येत धडकली; दीड वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत
Kolhapur Crime : चिमुरडीच्या शरीरावर कुठेही जखम नसली तरी लहान मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खेळकर असलेल्या क्रिशिकाच्या जाण्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) गडहिंग्लज तालुक्यातील निलजीमध्ये वडिल चारचाकी वळविताना पाठीमागून चिमुरडी धावत आल्यानंतर धडकल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. क्रिशिका अमित रामपुरे (वय दीड वर्षे, रा. निलजी, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी मृत बालिकेचे नाव आहे. चारचाकी वळवताना अचानक पाठीमागून धावत आल्याने क्रिशिका गाडीवर आदळली.
लहान मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार निलजीमध्ये अमित रामपुरे यांचे घर आहे. त्यांचा शेतीसह चारचाकी वाहन भाडोत्री देण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी (13 डिसेंबर) दुपारच्या सुमारास घराजवळ गाडी मागे घेऊन वळवून घेत होते. याचवेळी अचानकपणे वडिलांकडे धावत आलेली क्रिशिका गाडीवर आदळली. गाडीला धडकल्याने क्रिशिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला अत्यंत गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयाकडे नेतानावाटेतच प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे. तिच्या शरीरावर कुठेही जखम नसली तरी लहान मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खेळकर असलेल्या क्रिशिकाच्या जाण्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
अचानक चक्कर आली अन्..
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हाकवे (ता. कागल) येथील 24 वर्षीय हर्षद महिपती पाटील या युवकाचे आकस्मिक निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. हर्षद मित्रांसोबत जनावरांना वाडे तोडून झाल्यानंतर दुचाकीवर बांधून घरी परतत होता. यावेळी रस्त्यात बैलगाडीत तोडलेला ऊस भरला जात होता. यावेळी मित्र परिवार एकमेकांशी बोलत थांबले होते. यावेळी अचानक हर्षदला चक्कर आली. तो मोटरसायकल सोडून दुसऱ्या बाजूला कोसळला. सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. परंतु, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या