Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा
Dhairyashil Mane : खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून सन्मानाची वागणूक मिळूनही बंडखोरी का केली? असाच प्रश्न मतदारांना आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांना पडला आहे.
Dhairyashil Mane : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बंडखोरीवर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाले. या दोन्ही खासदारांना शिवसेनेकडून सन्मानाची वागणूक मिळूनही बंडखोरी का केली? असाच प्रश्न मतदारांना पडला आहे. भाषण कौशल्याच्या जोरावर धैर्यशील माने यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही ठळक कामाची नोंद मतदारसंघात दिसून आलेली नाही.
खासदार धैर्यशील माने यांनी मातोश्रीवरील बैठक तसेच कोल्हापुरात झालेल्या शिवसेना मेळाव्याला दांडी मारल्याने त्यांच्याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांनी तब्येतीचे कारण देत दांडी मारली होती. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून आपण खूप प्रयत्न केले, पण परस्थिती हाताबाहेर गेल्याने निर्णय घ्यायची वेळ आली, असे सांगणारी त्यांनी ऑडिओ क्लीप मतदारसंघात व्यवस्थित व्हायरल होईल, याची काळजी घेतली होती. काल 12 आमदारांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यामध्ये धैर्यशील माने यांचाही समावेश होता.
माने घराला तब्बल अडीच दशकांचा राजकीय वारसा
जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तिसरी पिढी कार्यरत आहे. त्यामुळे माने घराण्याला राजकीय वारसा खूप मोठा आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब माने काँग्रेसकडून यांनी तब्बल पाचवेळा प्रतिनिधीत्व केले. 1977 पासून ते 1991 च्या निवडणुकीपर्यंत ते सलग विजयी झाले. याच मतदारसंघातून धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनीही दोनवेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यांचीच राजकीय परंपरा धैर्यशील माने यांना लाभली आहे. अगोदर हा इचलकरंजी मतदारसंघ होता, पण 2008 मध्ये पुर्नरचना झाल्याने हा मतदारसंघ हातकणंगले मतदारसंघ झाला. या मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळ्याचा भाग समावेश आहे.
कोण आहेत धैर्यशील माने?
हातकणंगले लोकसभामतदारमध्ये 7 वेळा प्रतिनिधित्व माने घराण्याकडे राहिले आहे. धैर्यशील माने यांचा राजकीय प्रवासाची सुरुवात रुकडी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होण्यापासून झाली. धैर्यशील माने 2007 मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
माने गटाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तगडा हादरा मिळाल्याने त्यांची राजकीय वाटचाल खडतर झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही योग्य स्थान न मिळत नव्हते. नोव्हेंबर 2018 मध्ये धैर्यशील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनीही तरुण चेहरा असल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारी दिली. त्याचवेळी धैर्यशील माने यांच्या पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या, तरी शिवसेनेकडून त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला.
वंचितच्या उमेदवाराला मिळालेली अनपेक्षित मते आणि राजू शेट्टी यांचा गाफीलपणा यामुळे धैर्यशील माने यांचा विजय सुकर झाला. त्यामुळे धैर्यशील माने यांना पहिल्याच प्रयत्नात खासदारकी गळ्यात पडली. भाषण कौशल्य असल्याने शिवसेनेने त्यांना सन्मान देत प्रवक्तेपदी नेमणूक केली. मात्र, त्यांना या पदावर काही काळ काम केले.
सगळं देऊनही बंडखोरी का केली? हे कोडे कार्यकर्त्यांना सुटेना
जो मातोश्रीवर सहज प्रवेश मिळत नाही, तो धैर्यशील माने यांना सहज मिळाला होता. इतकचं नाही, तर खासदार झाल्यानंतर त्यांना प्रवक्तेपदी दिले. मुळचे शिवसैनिक नसतानाही पक्षाकडून उचित सन्मान राखला गेला. असे असूनही शिंदे गटात धैर्यशील माने यांनी जाण्याचा निर्णय का घेतला? याचीच चर्चा मतदारसंघात रंगली आहे. हातून काहीच ठोस काम झालं नसल्याने मतदारसंघातील कोरे-आवाडे-महाडिक-हाळवणवकर गटाचा फायदा आपल्याला 2024 मध्ये होईल, या अंदाजाने शिंदे गटात गेल्याची चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या