Kolhapur News: कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर; काम वर्षभरात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
Kolhapur News: कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर (International Convention Center at Kolhapur) उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. कोल्हापूर (Kolhapur News) शहराच्या वैभवात भर घालणारे हे सेंटर वर्षभरात तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या सेंटरसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे सेंटर निर्माण करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
असे असणार आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते. राजाराम तलावाजवळ तयार होणाऱ्या या कन्व्हेंशन सेंटरमध्ये 2 हजार क्षमतेचं ऑडिटेरिअम, बहुउद्देशीय हॉल, कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर आदी सुविधा असतील. राजाराम तलावामध्ये संगीत कारंजे, लाईट ॲण्ड साऊंड शो ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
स्थानिक कलावंतासाठी आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर हक्काचे व्यासपीठ होणार असून याठिकाणी शहर आणि परिसरातील छोटे व्यासायिक, उद्योजक यांना विविध विषयांवर प्रदर्शनासाठी केंद्र उपलब्ध होणार आहे. सेंटर निर्माण करतानाच त्याठिकाणी वृक्षरोपण करून त्याचे सुशोभीकरण करावे. त्याचबरोबर याभागात येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता पंचतारांकीत हॉटेलसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये भारत राखीव बटालियन क्र.3 ला जागा मंजूर करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी करावी आणि लोकांचे हित तसेच भारत राखीव बटालीयनसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबाबत चर्चा करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या